Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगमध्ये यु मुम्बा बाद फेरीच्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:12 IST2024-12-12T18:11:39+5:302024-12-12T18:12:47+5:30
तमिळ थैलवाजवर मात : अजित चौहानची सातत्यपूर्ण कामगिरी

Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगमध्ये यु मुम्बा बाद फेरीच्या उंबरठ्यावर
पुणे : स्थानिक खेळाडू अजित चौहानचे (१०) आणखी एक सुपर टेन, अमिर मेहमूद झफरदानेशच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यु मुम्बाने प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी तमिळ थलैवाजवर ४७-३१ असा दणदणीत विजय मिळविला. या विजयाने यु मुम्बाला हरियाना स्टिलर्सनंतर बाद फेरीच्या उंबरठ्यावर आणले. यु मुम्बा संघ ६० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. तमिळचे आव्हान राखण्याचे प्रयत्न मात्र फोल ठरले.
सामन्याला केलेली वेगवान सुरुवात आणि त्यानंतर नियोजन पद्धतीने या खेळात केलेले बदल हेच यु मुम्बाच्या आजच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. नेहमीप्रमाणे अजित चौहानने महत्वाचा वाटा उचलला. झफरदानेशच्या अष्टपैलू कामगिरीची आणि मनजीतच्या चढाईतील ८ गुणांची त्याला साथ मिळाली. लोकेशने बचावात मिळालेले ४ गुणही महत्वाचे ठरले. मुम्बाकडून खेळलेल्या एकूण ९ खेळाडूंपैकी केवळ रिंकू वगळता प्रत्येकाने एकतरी गुण मिळविला. परवेश भैन्सवालला गवसलेली लय त्यांना समाधान देणारी ठरली. तमिळकडून मोईन शफाघीला (१०) अन्य सहकाऱ्यांकडून तगडी साथ मिळू शकली नाही.
उत्तरार्धाला सुरुवात झाली तेव्हा यु मुम्बाने पहिली दहा मिनिटे संपली तेव्हा खेळावर नियंत्रण सुटणार नाही याची काळजी घेतली. अजित चौहान, झफरदानेश, मनजीत यांच्या चढाया मुम्बासाठी गुण वसूल करत होत्या. तर तमिळकडून मोईन शफाघी झुंज देत होता. उत्तरार्धाच्या पहिल्या टप्प्यात तरी चढाईपटूंचेच वर्चस्व राहिले होते. या टप्प्यात दोघांनाही बचावात केवळ प्रत्येकी दोन गुणांची कमाई करता आली होती.
उत्तरार्धात मुम्बाला परवेश भैन्सवालला लय सापडल्याचा निश्चित दिलासा मिळाला. त्याहीपेक्षा सोमवीरच्या जागी संधी मिळालेल्या लोकेश घोसालियाने केलेली चमकदार कामगिरी त्यांची ताकद खोलवर असल्याची खात्री देण्यास पुरेशी होती. उत्तरार्धात अखेरच्या टप्प्यात मुम्बाने पुन्हा वेग घेतला आणि तिसऱ्यांदा तमिळ संघावर लोणची नामुष्की आणली. यावेळी मम्बाची ४१-२६ अशी भक्कम स्थिती राहिल्यामुळे उर्वरित पाच मिनिटांत मुम्बाने आपल्या राखीव चडाईपटूंची चाचणी करून घेतली.
सामन्याला कमालीची वेगवान सुरुवात झाली होती. यु मुम्बाने चढाई आणि बचावाच्या जोरावर पहिल्या पाच मिनिटांत तमिळ थलैवाज संघावर लोणची नामुष्की दिली होती. तेव्हा यु मुम्बाचे ९ गुण होते, तर तमिळला अजून खाते उघडता आले नव्हते. पहिल्या टप्प्याला मुम्बा १०-९ असे पुढे राहू शकले. बचावात एक परवेश भैन्सवाल वगळला, तर मुम्बाचा प्रत्येक खेळाडू गुणांसाठी धडपडत होता. अर्थात, मुम्बाकडे अजित चौहान आणि झफरदानेश यांच्या चढायांमुळे आघाडीची गाडी सुसाट राहिली. पूर्वार्ध संपता संपता यु मुम्बाने आणखी एक लोण देत तमिळला मध्यंतराला २२-१४ असे अडचणीत आणले.
हरयाणा स्टीलर्स संघाचा प्लेऑफ मध्ये प्रवेश
हरयाणा स्टीलर्स संघाने बंगळुरू बुल्स संघावर ३७-२६ अशी मात केली. हरयानाने गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखत प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चित केला. हरयाणाने आतापर्यंत १८ सामन्यांपैकी १४ सामने जिंकून साखळी गटात आघाडी स्थानी कायम आहे याउलट बंगळुरू बुल्स संघ तळाच्या स्थानी १२ व्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी फक्त दोनच सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. मात्र सुरुवातीला बंगळूरुच्या खेळाडूंनी त्यांना चांगली लढत दिली. त्यामुळेच पहिले दहा मिनिटे गुणफलकावर एकही गुण नोंदविला गेला नव्हता. दहाव्या मिनिटाला हरियाणा संघाकडे ७-६ अशी केवळ एक गुणाची आघाडी होती. मध्यंतराला त्यांनी १५-११ अशी आघाडी मिळविली होती.