Pro Kabaddi League 2024: यु मुम्बा संघाचा पाटणा पायरेट्सला पराभवाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 19:17 IST2024-12-20T19:16:38+5:302024-12-20T19:17:00+5:30
यु मुम्बा संघाने तिसऱ्या स्थानावर असलेल्या पाटणा पायरेट्स संघावर ४३-३७ अशी मात करत अनपेक्षित विजयाची नोंद केली

Pro Kabaddi League 2024: यु मुम्बा संघाचा पाटणा पायरेट्सला पराभवाचा धक्का
पुणे : अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत यु मुम्बा संघाने साखळी गटात तिसऱ्या स्थानावर असलेल्या पाटणा पायरेट्स संघावर ४३-३७ अशी मात करत अनपेक्षित विजयाची नोंद केली. मध्यंतराला त्यांच्याकडे दहा गुणांची आघाडी होती हीच आघाडी निर्णायक ठरली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्याच्या तुलनेत यु मुम्बा व पाटणा या संघांमधील लढत सुरुवातीला रंगतदार झाली. तरीही मुंबा संघाने आघाडी कायम ठेवण्याच्या दृष्टीने चांगले प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्यांच्या डावपेचांनाही यश मिळाले. मध्यंतराला मुम्बा संघाकडे २४-१४ असे दहा गुणांची आघाडी होती. त्यांचा आधारस्तंभ असलेल्या चढाईपटू अजित चौहान याच्याबरोबरच मनजीत व रोहित राघव यांनीही खोलवर चढाया करीत अधिकाधिक गुण मिळविले. पाटणा संघाकडून देवांक याने चढाईमध्ये तर दीपक याने पकडीत उल्लेखनीय कामगिरी केली.
उत्तरार्धात पाटणाचे खेळाडू यु मुम्बा संघाच्या खेळाडूंना कसे रोखतात याचीच उत्सुकता होती तथापि दुसऱ्या डावातही मुम्बा संघाच्या खेळाडूंनी आघाडी वाढवण्याच्या दृष्टीने खूप चांगले प्रयत्न केले. उत्तरार्धात चौथ्या मिनिटाला त्यांनी आणखी एक लोण चढविला. शेवटची दोन मिनिटे बाकी असताना मुंबा संघाकडे ४१-३१ अशी आघाडी होती. या दोन मिनिटांमध्ये पाटणाचा संघ मुंबई संघावर लोण चढविणार की नाही याचीच उत्सुकता होती. या दोन मिनिटांमध्ये मुम्बा संघावर लोण चढविला गेला. तरीही मुंबा संघाची बाजू सुस्थितीत होती. कारण त्यावेळी त्यांच्याकडे सात गुणांचे अधिक्य होते.