उदय जोशीला डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी; वैद्यकीय कोठडीची मागणी फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 09:33 IST2024-12-06T09:32:05+5:302024-12-06T09:33:43+5:30
निनाद सहकारी पतसंस्था ठेवीदार फसवणूक प्रकरण

उदय जोशीला डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी; वैद्यकीय कोठडीची मागणी फेटाळली
पुणे : निनाद पतसंस्थेतील ठेवीवर बँकेपेक्षा जास्त व्याजदराचे आमिष दाखवून २३ जणांची एक कोटी ७९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे संचालक उदय त्र्यंबक जोशी याला न्यायालयाने ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. रक्तातील साखरेची पातळी चारशे ते साडेचारशेपर्यंत पोहोचली असून पायास सूज आल्याने त्याला पोलिस कोठडीचे हक्क अबाधित राखत वैद्यकीय कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. मात्र, न्यायालयाने ती नामंजूर करीत त्याला ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवत पोलिस कोठडी सुनावली.
जोशी याला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली असता रक्तातील साखरेची पातळी वाढण्यासह पायास सूज आल्याचे दिसून आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुतविक आर्वे यांनी पुढील उपचारासाठी त्याला गुरुवारी (दि. ५) रुग्णालयात दाखल केले असून त्याला पोलिस कोठडीचे हक्क अबाधित राखत वैद्यकीय कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. मात्र, न्यायालयाने ती नामंजूर करत ससून रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीचे आदेश देत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणात, जोशी यांच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे व ॲड. अक्षय खडसरे यांनी काम पाहिले.
सदाशिव पेठ परिसरात निनाद सहकारी पतसंस्था असून उदय जोशी हे त्याच्या संचालक मंडळावर २००२ ते २०२२ दरम्यान अध्यक्ष होते. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने ठेवीदारांना ठेवी ठेवल्यास इतर बँकांपेक्षा जादा व्याजदर देऊन व ज्येष्ठ नागरिकांना एक टक्का अधिकचा व्याजदर देण्याचे आमिष दाखविले. ठेवीदारांना पतसंस्थेत ठेव ठेवण्यास भाग पाडून ठेवीदारांना वर्षानुवर्ष परतावा परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.