"भाजप प्रादेशिक पक्षांना संपवतेय यात तथ्य नाही; मुख्यमंत्र्यांकडेच जागावाटपाचे सर्वाधिकार"
By राजू इनामदार | Published: March 19, 2024 07:48 PM2024-03-19T19:48:20+5:302024-03-19T19:48:59+5:30
शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जागावाटपाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले....
पुणे : भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्षांना संपवते अशी टीका केली जात आहे; मात्र टीकेत तथ्य नाही. तसे असते तर त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रिपद दिले नसते. लोकसभेच्या जागावाटपात भाजपकडून आमचा पूर्ण सन्मान ठेवला जाईल. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जागावाटपाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी शिवसेनेचा महिला व युवा सेना कार्यकर्ता मेळावा पक्षाच्या कार्यालयात झाला. शहराध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे, संपर्क नेते संजय माशिलकर, सहायक संपर्क अजय भोसले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यावेळी उपस्थित होते.
मेळाव्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना सामंत यांनी सांगितले, की मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या जागांसाठी भाजपबरोबर बोलणी करीत आहेत. तीन पक्षांची युती आहे, काही गोष्टींमध्ये मागेपुढे करावे लागते, याचा अर्थ अवमान केला असा होत नाही. त्यामुळे भाजप शिवसेना ही युती एकत्रितपणे काम करेल व मोदी यांना अपेक्षित असलेल्या ४० पेक्षा जास्त राज्यातून मिळवून देईल. शिवसेनेचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मोठी आघाडी घेतील.
मुंबईच्या सभेत उद्धव ठाकरे यांना केवळ ५ मिनिटे बोलण्याची संधी मिळाली. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात पक्षप्रमुख म्हणून ते पाऊण तास बोलत असत. मुंबईमध्ये कोणीतरी त्यांचे नाव पुकारले व त्यांना बोलावे लागले. यावरून त्यांचा तिथे काय मान आहे, ते लक्षात येते, असे सामंत म्हणाले. आगामी काळात त्यांच्याकडून अनेक नेते शिवसेनेत येतील.
मनसेबरोबर बोलणी सुरू आहे, हे खरे आहे; मात्र मला पेलवतील असेच प्रश्न विचारा असे म्हणत यावर काहीही बोलण्याचे सामंत यांनी टाळले. इलेक्टोरल बॉण्ड हा काही आजचा प्रकार नाही. सगळेच यात आहेत. त्यामुळे यामध्ये फक्त भाजपला दोष द्यावा, असे काहीही नाही. देशातील सर्वांत जास्त बॉण्ड व्यवहार पश्चिम बंगालमध्ये झालेले आहेत, तिथे तर भाजपचे सरकारही नाही, असे सामंत म्हणाले.
मुरलीधर मोहोळ यांनी घेतली भेट
मेळावा सुरू असतानाच तिथे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आले. सामंत यांनी त्यांचे स्वागत करीत गळाभेट घेतली. शिवसैनिक सर्वतोपरीने तुम्हाला साथ देतील, असे त्यांनी सांगितले. मेळाव्यात सामंत यांनी महिला व युवा कार्यकर्त्यांना प्रचारापासून ते मतदान केंद्रापर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा, राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार थेट तळापर्यंत करा, अशा सूचना केल्या.