'उदयनराजेंना कुणाचाही विरोध नाही, लवकरच अंतिम निर्णय जाहीर करू'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:38 PM2018-09-25T17:38:22+5:302018-09-25T17:44:11+5:30
शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केला, अशा बातम्या माध्यमांत आल्या होत्या.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणाचाही आक्षेप नाही. याबाबत सातारा जिल्हाध्यक्ष आणि संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे, उदयनराजे सर्मथकांचा जीव भांड्यात पडला.
शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केला, अशा बातम्या माध्यमांत आल्या होत्या. तसेच लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उदयनराजे नको, इतर कुठलाही उमेदवार द्या, असा सूर साताऱ्यातील नेत्यांचा होता. याबाबत खासदार उदयनराजेंना संबंधित बैठकीचा वृत्तांत पोहोचताच, त्यांनी थेट पुणे गाठले. त्यानंतर, सायंकाळी 6 वाजता पुण्यातील मोदीबाग या विश्रामस्थानी पवार आणि उदयनराजे यांचीही लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली. त्यावेळी, सकाळच्या बैठकीबाबत उदयनराजेंनी पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यावर उदयनराजेंना हवं असलेलं उत्तर मिळविण्यासाठी वाट पाहण्यास सांगितली अशाही बातम्या होत्या. त्यामुळे , पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत माझी बैठक झाली. आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन बैठका घेतल्या. लोकसभेसाठी उदयनराजेंच्या नावाला कोणीही विरोध केला नाही. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असे पवार यांनी म्हटले. दरम्यान, लवकरच याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असेही पवार यांनी सांगितले.