राज्यपालांच्या निषेधार्थ 3 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर जनआक्रोश करणार - उदयनराजे भोसले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 04:12 PM2022-11-28T16:12:25+5:302022-11-28T16:12:35+5:30
शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर त्यांचे नाव घेण्याचा कुणाला अधिकार नाही
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याचे संपूर्ण पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपालांच्या निषेधार्थ 3 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर जनआक्रोश करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले, हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तरी परवडलं असत. असे बोलत असताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. येत्या 3 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर आक्रोश व्यक्त करणार आहोत. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर त्यांचे नाव घेण्याचा कुणाला अधिकार नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
भारत मोठी लोकशाही असला तरी तुकडे होण्यास किती वेळ लागणार
ज्या ज्या वेळेस महाराजांची अवहेलना केली जाते. त्या त्या वेळी राग कसा येत नाही. सर्वच पक्षाचा मूळ अजेंडा हा शिवरायांचे विचार आहेत. तसं नसेल तर शिवरायांचे नाव तरी का घेता. भावी पिढीसमोर काय इतिहास ठेवणार. चुकीचा इतिहास ठेवला तर येणाऱ्या पिढीला हाच खरा इतिहास वाटेल. राष्ट्रद्रोहाच्या कायद्यासोबतच महापुरुषांचा अपमान होणार नाही याबद्दलही कायदा करावा. इतिहासासोबत अशीच छेडछाड सुरू राहिली. तर भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असला तरी तुकडे होण्यास किती वेळ लागणार आहे.
तेव्हा तुम्हाला दुःख होत नाही का?
शिवरायांचा महाराष्ट्र आहे. लोकशाहीतले राजे लोकं आहेत. त्यांनीच आता जागे व्हावे. लोकशाहीतले राजे कधी जागे होणार. शिवरायांची अवहेलना म्हणजे आपली अवहेलना, त्यांचा अपमान म्हणजे आपला अपमान. त्यांनीच आता जाब विचारावा. त्या त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी काहीतरी ठरवण्याची वेळ आली आहे. शिवजयंती तरी साजरी का करायची, शिवरायांचे पुतळे तरी का उभारायचे. जेव्हा त्यांचा अपमान होतो तेव्हा तुम्हाला दुःख होत नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.