"राजे जिंदगीत असं म्हणूच शकत नाही"; सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 07:03 PM2023-11-16T19:03:47+5:302023-11-16T19:05:08+5:30
जरांगेच्या सातारा येथील सभेवरून वाद निर्माण झाले आहेत. साताऱ्यातील शिवतीर्थ इथं मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असल्याचे बोलले जाते.
पुणे - मराठ्यांच्या लेकरांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला असून पुरावे असताना जाणूनबुजून लपवण्यात येत होते, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांची दौंडमधील वरवंड येथील बाजार मैदानात विराट सभा झाली. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका व पुढील दिशाही सांगितली. यावेळी, साताऱ्यातील कार्यक्रमाला होत असलेल्या विरोधाचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
जरांगेच्या सातारा येथील सभेवरून वाद निर्माण झाले आहेत. साताऱ्यातील शिवतीर्थ इथं मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असल्याचे बोलले जाते. मात्र, जरांगे पाटलांनी साताऱ्यात अन्यत्र सभा घ्यावी परंतु शिवतीर्थ इथं सभा घेऊ नये असं मराठा आंदोलन तेजस्विनी चव्हाण यांनी म्हटलं आहे.
साताऱ्यात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. मात्र, दोन्ही राजेंकडून साताऱ्यातील या कार्यक्रम घेऊ नये असं म्हटलं जातय, यासंदर्भातील प्रश्न जरांगे यांना विचारण्यात आला होता. त्यावर, हे हे.. असं होऊच शकत नाही. राजे आमचं दैवत आहे भाऊ... ती राजगादी आहे, लेकरांवरती महाराष्ट्रातील गोरगरिबांवरती साताऱ्याच्याच मायेचा हात आहे. राजे कार्यक्रम घेऊ नका म्हणणार असं होऊच शकत नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. दौंडमध्ये पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी साताऱ्यातील सभेसंदर्भात भाष्य केलं.
मला यावर विश्वासच नाही, राजे म्हणत असतील तर मी काहीही करायला तयार आहे. कारण, समाजाला न्याय मिळतोय आणि राजगादी असं म्हणतेय हे होऊच शकत नाही. मला व्हिडिओ दाखवा मग मी बोलता. कारण, राजे असं बोलू शकत नाही. राजे जिंदगीत असं म्हणून शकत नाही, हा गोरगरिबांच्या कल्याणाचा विषय आहे. राजे म्हणतील ते २ मिनिटांत आम्ही ऐकायला तयार आहोत. पण, ते असं म्हणूनच शकत नाहीत, जर तसं असेल तर राज्यात केवढा मोठा संदेश जाईल, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
माझ्या आंदोलनामागे कोण आहे? हे राज ठाकरेंनीच शोधून काढावं आणि मलादेखील सांगावं. या आंदोलनामागे कोणाचाही हात नसून ही मराठा समाजाची साथ आहे. त्यासोबतच मराठ्याची लेकरं मोठे व्हायला लागले. त्यांचं कल्याण व्हायला लागलं की, अशी वक्तव्य करायला सुरुवात होते. आमच्यावर खोटे आरोपदेखील केले जातात. मात्र, मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही. मराठा समाजाला स्पष्ट माहिती झालं आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि सगळे मराठा मिळून आम्ही आरक्षण मिळवणारच आहोत, असंही जरांगे यांनी म्हटलं.
७० वर्षे पुरावे लपवून ठेवले होते
गोरगरीब मराठ्यांचे मुडदे पाडून सत्तर वर्षे सरकारने पाळलेले बागलबच्चे समिती नेमतात, आयोग बनवले; पण मराठ्यांची नोंद सापडली नाही. ओबीसीमध्ये असतानाही आमच्या मराठ्यांचे पुरावे शोधले नाही. आता, समितीने पुरावे शोधण्यास सुरुवात केली. १८०५ पासून न्यायमूर्तींनी २०२३ पर्यंतचे पुरावे आजरोजी सापडले आहेत. या सरकारने ७० वर्षे पुरावे लपून ठेवले होते, आज कसे सापडले? मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण असताना घात केला. यांनी ठरवून षडयंत्र केले आहे. मराठ्यांच्या विराट शक्तीपुढे सरकार जागे झाले. या एकीपुढे सरकारने नमते घ्यावे लागले. मराठ्यांचा २४ डिसेंबरला विजय होणार आहे. आता मागे नाही हटणार. आपण ७० टक्के लढा जिंकला आहे, असेही जरांगे यांनी म्हटले.