पुणे जिल्ह्यात 'उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना' भक्कम; तर 2 तालुक्यात 'बाळासाहेबांची शिवसेना’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:18 PM2022-11-04T12:18:17+5:302022-11-04T12:18:39+5:30
दोन्ही पक्षात ऐन निवडणुकीच्या काळात जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे
पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची साथ मिळाल्याने जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा जोर वाढत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचेही जुने संघटन कायम असून, या दोन्ही पक्षात ऐन निवडणुकीच्या काळात जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
दोन बडे नेते शिंदेंबरोबर
माजी मंत्री विजय शिवतारे पुरंदर तालुक्यातील आहेत, तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा लोकसभा मतदारसंघ शिरूर आहे, तर तालुका आंबेगाव आहे. मूळ शिवसेनेत असलेल्या या दोन्ही नेत्यांनी फूट पडल्यानंतर काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट जवळ केला. त्यामुळे आता या दोन्ही तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेनेचा जोर वाढत आहे. दुसरीकडे नेतेच गेल्यामुळे संधीची वाट पाहणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी मूळ शिवसेना भक्कम करण्याचा प्रयत्न या दोन तालुक्यात चालवला आहे.
अन्यत्र अस्तित्व नाही
जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये मात्र अद्याप कोणीही मोठा नेता किंवा शिवसेनेच्या संघटनेतील मोठे नाव असलेला पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेनेला मिळालेला नाही. त्यामुळे दोन तालुके वगळता अन्य ठिकाणी शाखांवर ताबा मिळवणे, नवी शाखा तयार करणे असे प्रकार अजून मोठ्या संख्येने सुरू झालेले नाहीत. पुरंदर, आंबेगाव तालुक्यामध्ये मात्र बाळासाहेबांची शिवसेना या नावाने शाखा सुरू झाल्या आहेत.
अन्यत्र मूळ शिवसेना भक्कम
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आहेत. त्यावर अजून बाळासाहेबांची शिवसेना यांनी दावा सांगितलेला नाही किंवा जबरदस्तीने ताबा घेण्याचाही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे तालुक्यांमधील मूळ शिवसेनेतील स्थिती दिसायला तरी भक्कम आहे. मात्र, आमदार किंवा अन्य कोणतेही मोठे राजकीय पद नसल्याने कार्यकर्ता स्तरावरच तिथे मूळ शिवसेनेचे अस्तित्व दिसते.
पुणे शहरातील स्थिती
- पुणे शहरात पूर्वीच्या युवा सेनेचे राज्यसचिव किरण साळी, हडपसरचे माजी नगरसेवक नाना भानगिरे, माजी शहरप्रमुख अजय भोसले यांनी बाळासाहेबांची शिवसेना यांना उघड साथ दिली आहे. त्यातील भोसले यांना जिल्हाप्रमुख, भानगिरे यांना शहरप्रमुख, तर साळी यांना युवा सेना राज्यप्रमुखपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. सारसबागेजवळ या शिवसेनेचे सेनाभवनही लवकरच सुरू करण्यात येत आहे.
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यातील ९ नगरसेवक मूळ शिवसेनेतेच आहेत. त्यांचे सेनाभवनही कार्यरत आहे. शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्यासह संघटनेतील बहुसंख्य नवे-जुने पदाधिकारी व त्यांच्या शाखाही मूळ शिवसेनेबरोबरच आहेत.
- विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या मूळ शिवसेनेबरोबर आहेत. त्याशिवाय माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व राज्यस्तरावर नाव असलेले पुण्यातील अन्य नेतेही मूळ शिवसेनेतच आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शहरातील गड अजूनही भक्कम आहे.