उद्धवसेनेला पुण्यात मोठा धक्का, पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
By राजू हिंगे | Updated: January 7, 2025 20:26 IST2025-01-07T20:26:20+5:302025-01-07T20:26:55+5:30
पाचजण शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती

उद्धवसेनेला पुण्यात मोठा धक्का, पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये मुंबईत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धवसेनेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यामध्ये विशाल धनवडे, बाळा ओसवाल हे दोन माजी नगरसेवक आणि पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट या तीन माजी नगरसेविकांचा समावेश आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण, सुनील कांबळे , राजेश पांडे , भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते. उद्धव सेनेच्या वरिष्ठांकडून पक्ष वाढीसाठी कोणतेही निर्णय घेतले जात नाही असा आरोप करून यातील माजी नगरसेवकांनी पक्ष सोडत असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. सोशल मीडिया अकाउंट वरून या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन दिवसांमध्येच यातील तीन नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केल्याचे शिवसेना ठाकरे पक्षाने जाहीर केले होते.
शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन आठ माजी नगरसेवकांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यातील पाचजण शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. अखेर आज पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर या सर्वांनी मार्गक्रमण केले याचा मनस्वी आनंद आहे. भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. तो समर्पित कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचवावी. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, भाजपचा मोठा परिवार आहे. या कुटुंबात नवीन सदस्यांचे सहर्ष स्वागत करतो. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले नव्या जुन्यांची सांगड घालून पक्ष वाढीसाठी तुम्ही प्रयत्न कराल ही अपेक्षा आहे.