उद्धव ठाकरेंचे ४ आमदार कधीही आमच्याकडे येतील; नारायण राणेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 12:40 PM2022-10-23T12:40:01+5:302022-10-23T12:40:14+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता मातोश्री पुरतेच मर्यादित
पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता मातोश्री पुरतेच मर्यादित राहिले असून, त्यांच्याकडे केवळ ६ ते ७ आमदार राहिले आहेत. त्यापैकी ४ जण आमच्या संपर्कात असून, ते कधीही आमच्याकडे येतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या १० लाख पदांच्या नोकर भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा शुभारंभ झाला. पुण्यातही ‘यशदा’ येथे राणे यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांविषयी राणे म्हणाले, राजकारणातील स्तर घसरू नये, असे मला वाटते. विरोधकांची वैचारिक पातळी तपासण्याची गरज आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपाविषयी ते म्हणाले की, याबाबत पुण्यातील लोकांना जास्त माहिती आहे. मला कोकणात राहून काही माहिती नाही. जाधव यांनी भाषणात केलेली टिंगल, मस्करी हा काय चांगला गुण नाही.
राज्य सरकारकडून रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत असलेल्या दिवाळीच्या किटवरील सत्ताधारी राजकीय नेत्यांचे फोटो विषयी राणे म्हणाले, फोटो दिला, तर बिघडले कोठे? त्याच्यावर कागद टाका आणि पाकीट फोडा. तुम्हाला इच्छा असेल, तर तुम्हीही फोटो लावून नागरिकांना किट द्या. संकुचित वृत्ती ठेवू नका.