वापर संपला की BJP त्यांना सोडते, टिळक कुटुंब आणि गिरीश बापटांसोबत तेच घडलं- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 08:48 PM2023-02-23T20:48:28+5:302023-02-23T20:49:00+5:30
आजारी असतानाही बापटांना प्रचारात उतरवणं पाशवी....
पुणे : भाजप लोकांचा उपयोग संपला की त्यांना सोडून देते. एखाद्याचा वापर संपला की त्याला किंमत त्या पक्षाकडून मिळत नाही. भाजपने टिळक कुटुंबियांवर अन्याय केला. त्यांचा फक्त वापर करून घेतलाय. पुण्यात गिरीश बापटांबद्दल तेच झालं आहे. बापटांचा वापर करून भाजपने त्यांना सोडले. ते आजारी असतानाही त्यांना प्रचारात उतरवणं पाशवी आहे. याबद्दल भाजपने विचार करायला हवा होता, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. ते चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ऑनलाईन प्रचारसभा घेतली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, टिळक कुटूंबियाचा वापर करून भाजपने त्यांना फेकून दिलं आहे. बापटांना आजारी असतानाही प्रचारात उतरवलं. त्यांचे डबल इंजिन नुसतं धूर सोडतंय. आमच्या सोबत राहिले तर तांदळातले खडे आणि तुमच्यासोबत गेले तर धुतलेल्या तांदळासारखे? असा सवालही ठाकरे यांनी विचारला. धनुष्यबान चिन्ह, शिवसेना हे नाव चोरलं, याला लोकशाही मानत नाही, असंही ठाकरे म्हणाले.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रचारासाठी काही तास शिल्लक असताना उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेत महाविकास आघाडीचा प्रचार केला.