"ढेकणं चिरडायची असतात, नादाला लागण्याएवढ्या किमतीचा..."; ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 02:45 PM2024-08-03T14:45:58+5:302024-08-03T15:10:24+5:30
पुण्यात शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला होता. मी सगळं सहन करुन उभा राहिलोय, आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंड थोपटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटानं चिरडलं जातं, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली.
पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. गृहमंत्री अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वशंज असल्याचीही टीका उद्धव ठाकरेंनी केली. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांव निशाणा साधला.
"मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलं आहे. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस," अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे यांनी केली.
"मुनगंटीवारांनी वाघनखं आणली. अहो मुनगंटीवार नखाच्या मागे वाघ असतो तेव्हा त्या वाघनखांना अर्थ असतो. त्या नखांच्या मागे मुनगंटीवार असतील तर ते कुठेतरी जुळत आहे का? महाराष्ट्रातील वाघनखे ही महाराष्ट्राची जनता आहे," असाही खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
अमित शाहांचा अब्दालीचे राजकीय वशंज म्हणून उल्लेख
"काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते. पण ते परत का आले? महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले हे पाहण्यासाठी ते आले. अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता. नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचं का? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे हे म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही," अशी टीका उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर टीका केली.