Pune: जास्त आमदार, नगरसेवक निवडून आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 12:17 PM2023-10-09T12:17:01+5:302023-10-09T12:17:58+5:30
विविध मतदारसंघाची जबाबदारी चार माजी नगरसेवकांकडे दिली आहे....
पुणे : शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाने पुणे शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. ठाकरे गटाने पुण्यातील विधानसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या असून, विविध मतदारसंघाची जबाबदारी चार माजी नगरसेवकांकडे दिली आहे.
कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पृथ्वीराज सुताराकडे, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ विशाल धनवडे, पर्वती आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाकडे बाळा ओसवाल, वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी संजय भोसले यांच्याकडे देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे जास्तीत जास्त आमदार आणि नगरसेवक निवडून आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. त्यासाठी चार माजी नगरसेवकांकडे प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. हे चारही माजी नगरसेवक या मतदारसंघात निवडणूक समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. यंदाच्या विधानसभा आणि महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे चार माजी नगरसेवक पुणे शहर पिंजून काढणार आहे. शिवसेना पक्ष आणि संघटना बळकट करणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शहरातील प्रमुख नगरसेवकांना जबाबदारी दिली आहे