'शिवनेरी आहे जिथे, गद्दारांना थारा नको तिथे'; उद्धव ठाकरेंचा आढळरावांना अप्रत्यक्ष टोला
By प्रमोद सरवळे | Published: September 29, 2022 03:17 PM2022-09-29T15:17:24+5:302022-09-29T15:19:11+5:30
आज उद्धव ठाकरेंनी यवतमाळ आणि पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांशी मुंबईत मातोश्रीवर संवाद साधला...
पुणे : शिरूरमधली काही माणसं ढळली, जे अढळ आहेत तेच माझ्यासोबत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटलांना लगावला. आज उद्धव ठाकरेंनी यवतमाळ आणि पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांशी मुंबईत मातोश्रीवर संवाद साधला. सध्या हिंदुत्वाची तोतयागिरी करणाऱ्यांनी कळस गाठलाय. इतिहासात शिंदे गटाचे बंड तोतयांचे बंड म्हणून असं ओळखलं जाईल, असा घणाघातही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.
पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्या आढळराव पाटलांवर निशाणा साधला आहे. यावळी ते म्हणाले, ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे, तिकडे राजकारणामध्ये आता गद्दार लोकं आढळली नाही पाहिजेत. येत्या लोकसभा निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवा, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
पुणे जिल्ह्यात 'इनकमिंग'-
पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर पुणे कॅन्टोंमेंट विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेत इनकमिंग झाली आहे. शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिरूर मतदारसंघात शिवसेना ताकद कमी झाल्याचे बोलले जात होते. पण गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात शिवसेनेतील वाढती इनकमिंग पाहता जिल्ह्यात पुऩ्हा शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) जोर लावल्याचे दिसत आहे.
'आपल्याला सर्व लढाया जिंकायच्या आहेत'-
दसऱ्याला आता काहीच दिवस राहिलेले आहेत. शिवतीर्थावर आपण भेटणारच आहोत. वाजत-गाजत, गुलाल उधळत सर्व कार्यकर्ते तिथे येणारच आहेत. आपण सर्वांनी शिस्त पाळा. कोर्टातील लढाई असो किंवा निवडणुकीतील आपल्याला सर्व लढाया जिंकायच्या आहेत, अशा भावना उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडल्या.
'गद्दारांना लोळवणार'-
नवीन लोकांचे शिवसेनेत स्वागत आहे. पुणे जिल्ह्यात आम्ही जोमाने शिवसेना वाढवू. गद्दारांना लोळवल्याशिवाय सोडणार नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनाचा बालेकिल्ला होता आणि असेल. येत्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भगवा फडकणारच. आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी पंचायत समिती सदस्य, अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आणि लोकप्रतिनीधींनी मुंबईत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केल्याची माहिती शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी दिली.