भाजपा प्रभारी म्हणाले, उद्धव ठाकरे पार्ट टाईम मुख्यमंत्री; शिवसेनेकडून 'भारी' प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 09:24 AM2021-11-17T09:24:37+5:302021-11-17T09:39:49+5:30
शिवेसना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले होते. त्यावेळी, शिंदेंना सी.टी. रवी यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पार्टटाइम मुख्यमंत्री आहेत. फुलटाइम नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कधी उठतात, कधी झोपतात, कधी काम करतात जनतेला सर्व माहिती झाले आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासारख्या फुलटाइम मुख्यमंत्र्यांची गरज आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता शिवसेनेनं प्रभारी रवी यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलंय.
शिवेसना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले होते. त्यावेळी, शिंदेंना सी.टी. रवी यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने कोविडचे योग्य नियोजन केले. त्याचे सर्वोच्च न्यायालयाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तसेच, महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकासआघाडी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून भाजपाचे आरोप सुरू आहेत. परंतु आम्ही या आरोपांकडे लक्ष न देता राज्य सरकार कोविडच्या संकटाचा सामना करत आहे. तसेच विकास कामं करत आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीत मदतही केली,” असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनात सरकारचं काम चांगलं
राज्यात एकीकडे कोविडचं संकट, दुसरीकडे अतिवृष्टी, तिसरीकडे निसर्ग चक्री वादळ ही संकटं आली. अशा परिस्थितीतही सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. दोन्ही वेळी १०-१० हजार कोटी रुपयांचं पॅकेज देऊन मदत केली. अशा परिस्थितीत देखील विकास कामांना कुठेही कात्री लावली नाही. त्यामुळे सरकार उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करतंय हे चित्र स्पष्ट दिसतंय, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
भाजपच्या बैठकीत निशाणा
मुंबईत भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना सी. टी. रवी यांनी उद्धव ठाकरेंना पार्ट टाईम मुख्यमंत्री असल्याचे म्हटले. सदर वक्तव्य करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. आजचे मुख्यमंत्री पार्टटाइम आहे. फुलटाइम नाहीत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ झाला आहे, या शब्दांत रवी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.