उध्दव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वाला शिकवला चांगलाच धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:29+5:302021-01-25T04:10:29+5:30
पुणे : शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाला मुरड घातली आहे, असे वाटत नाही. उद्धव ठाकरे हे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा किमान ...
पुणे : शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाला मुरड घातली आहे, असे वाटत नाही. उद्धव ठाकरे हे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा किमान समान कार्यक्रम हा विचार घेऊन सत्तेत आले असून, त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाला चांगलाच धडा शिकविला आहे. आजचे सरकार सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारे सरकार आहे, अशी '' मार्मिक'' टिप्पणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी केली.
‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात शनिवारी (दि. 22 ) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या विषयी व्यक्त केलेल्या भावनांवर आधारित ‘पुत्र सांगती चरित पित्याचे’ ध्वनिचित्रफितीचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, हरिश केंची, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, सचिन इटकर, किरण साळी यांची प्रमुख उपस्थिती होते.
शिंदे म्हणाले, शिवसेना आज ज्या किमान समान कार्यक्रमानुसार सत्तेत आली. तेच हिंदुत्व प्रबोधनकारांना अपेक्षित होते आणि तेच खरे हिंदुत्व आहे. राज्यात शिवसेना 20 वर्षानंतर सत्तेत आली असून, खरं तर हे 25 वर्षे आधीच व्हायला हवे होते. त्यामुळे आता पुढे जाऊ या. बाळासाहेब टाकरे यांच्याकडे सर्व जाती-धर्माचे लोक यायचे. त्यांनी साबीर शेख या शिवसैनिकाला आमदार आणि मंत्री केले. हिंदुत्वाचा विचार करणारा तसेच सर्व धर्माची भूमिका मांडणारा आणि महाराष्ट्र वाचवणारा थोर नेता म्हणजे बाळासाहेब, अशा बाळासाहेबांच्या आठवणीना त्यांनी उजाळा दिला.
सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.
..