उध्दव ठाकरे यांचे एकविरा देवीच्या चरणी युतीच्या विजयाचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 14:11 IST2019-03-27T14:09:51+5:302019-03-27T14:11:55+5:30
उध्दव ठाकरे यांनी कार्ला गडावर पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत एकविरा देवीचे दर्शन घेतले.

उध्दव ठाकरे यांचे एकविरा देवीच्या चरणी युतीच्या विजयाचे साकडे
लोणावळा : लोकसभा निवडणुकीत शिवसेनाभाजपा, रिपाई महायुतीला चांगले यश मिळू दे, केंद्रात पुन्हा युतीचे सरकार बनू दे असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कार्ला गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चरणी घातले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी बुधवारी(दि. २७) कार्ला गडावर पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत एकविरा देवीचे दर्शन घेतले.
यावेळी मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, बबन पाटील, योगेश बाबर, भारत ठाकूर, गणेश जाधव, तालुकाप्रमुख राजु खांडभोर, शरद हुलावळे, सुरेश गायकवाड, अंकूश देशमुख, विशाल हुलावळे हे उपस्थित होते.
पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास उध्दव ठाकरे हेलिकॉप्टरने गडावर दाखल झाले. फटाक्यांच्या आताषबाजी व बॅन्ड वादनाने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कोणत्याही शुभकार्याच्या पूर्वी कुलस्वामिनीचे दर्शन घेण्याचा ठाकरे परिवाराचा कुलाचार आहे. देवीच्या आशीर्वादाने शिवसेना लोकसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहे. महायुतीला या निवडणुकीत भरघोस यश मिळू दे असे साकडे घातले असल्याचे सांगितले.