उद्योगनगरीत क्रिकेट दिवाळी
By admin | Published: February 16, 2015 04:38 AM2015-02-16T04:38:25+5:302015-02-16T04:38:25+5:30
योगायोगाने रविवारचा दिवस. त्यात विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय वाघांची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या संघाशी असणारी लढत.
पिंपरी : योगायोगाने रविवारचा दिवस. त्यात विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय वाघांची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या संघाशी असणारी लढत. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहते दिवसभर टीव्हीसमोर खिळून राहिले. परिणामी दिवसभर शहरामध्ये शुुकशुकाट राहिला. पण क्षणात या शुकशुकाटाचे जल्लोषात रूपांतर झाले. कारण भारतीय संघाने पाकिस्तानी संघाला पराभूत केल्याने फटाक्यांची आतषबाजी करीत नागरिकांनी आनंद व्यक्त केला. परिणामी शहरात उत्साह सामावला. शहरात पुन्हा दिवाळी असल्यासारखे चित्र होते.
आज भारतीय संघाचा या वर्षीचा पहिलाच आणि तोही पाकिस्तानी संघाशी सामना असल्याने क्रिकेटप्रेमी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. इतर नियोजन बाजूला सारून सकाळपासूनच सर्वांनी आपला वेळ सामन्यासाठी राखून ठेवला होता. नोकरदारांनी मुलांसोबत हा सामना साजरा करण्याचे नियोजन केले. त्यातच व्यावसायिकांचाही सुटीचा दिवस असल्याने शटर डाऊन करून तेही यात सामील झाले. तरुणांची सकाळपासूनच या विषयावर चर्चा होती.(प्रतिनिधी)