UGC NET Result: युजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर; ८३ विषयांसाठी झाली होती परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 08:52 PM2023-07-25T20:52:57+5:302023-07-25T20:54:19+5:30
देशभरातून विविध ८३ विषयातील ३७ हजार २४२ विद्यार्थी पात्र झाले आहेत....
पुणे : देशातील विद्यापीठे तसेच महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकपदी रूजू हाेण्यासाठी तसेच कनिष्ठ संशाेधन शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी नेट परीक्षा उत्तीर्ण हाेणे गरजेचे आहे. जून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी युजीसी नेट परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. देशभरातून विविध ८३ विषयातील ३७ हजार २४२ विद्यार्थी पात्र झाले आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) यंदा १३ ते १७ जून आणि १९ ते २२ जून २०२३ या दाेन टप्प्यांत ८३ विषयांमध्ये नेट परीक्षेचे विविध शहरांत आयाेजन केले हाेते. त्यानंतर एनटीएने दि. ६ जुलै रोजी युजीसी-नेट २०२३ तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध केली होती तसेच उमेदवारांना ८ जुलैपर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. विषय तज्ज्ञांकडून आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर मंगळवारी दि. २५ जुलै राेजी निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर आपला निकाल पाहता येईल. उमेदवारांनी त्यांचा युजीसी नेट जून २०२३ वर क्लिक करावे त्यानंतर प्रवेश अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पीन टाकून लाॅगिन केल्यानंतर निकाल प्रदर्शित हाेईल.
युजीसी-नेट परीक्षा दाेन्ही पेपरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पद किंवा महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती (जेआरएफ) मिळू शकते. एनटीएच्या माध्यमातून वर्षातून दाेन वेळा जून आणि डिसेंबर मध्ये युजीसी नेट परीक्षेचे आयाेजन करण्यात येते.