निळू फुले कला अकादमीत ‘उजाले के मुसाहिब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:18+5:302020-12-27T04:08:18+5:30
पुणे : विजयदान देथा या नामवंत लेखकाच्या ‘उजाले के मुसाहिब’ या कथेचे नौटंकी पद्धतीने सादरीकरण करणारे रूपाली गोडंबे, स्वप्निल ...
पुणे : विजयदान देथा या नामवंत लेखकाच्या ‘उजाले के मुसाहिब’ या कथेचे नौटंकी पद्धतीने सादरीकरण करणारे रूपाली गोडंबे, स्वप्निल पंडित आणि आदर्श राजपूत यांनी आपल्या नाटकाच्या प्रयोगांसाठी वेगळ्या जागांचा विचार प्रत्यक्षात आणत, लॉकडाऊननंतरचा आपला पहिला प्रयोग ‘निळू फुले कला अकादमी’ च्या गच्चीवर मोकळ्या आकाशाखाली केला.
‘अंधार दूर करण्यासाठी आधी डोक्यातील अंधार दूर व्हायला पाहिजे, डोक्यात प्रकाश पाडायला पाहिजे पण राजाच्या डोक्यातील अंधार दूर कोण करेल? मग तो म्हणेल तसं म्हणणारे हुजरे असतातच,’ अशाच आशयाचं राजस्थानी आणि हिन्दी भाषेतलं हे नाटक आहे. नाटकाचा कालावधी ५० मिनिटे असून रुपाली गोडंबे हिने या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. रूपाली गोडंबे आणि स्वप्निल पंडित हे दोघे कथा सादर करतात. आदर्श राजपूत सहाय्यक सादरकर्ता आहे. अभिनव जेऊरकर आणि दीपाली जांभेकर यांनी नाटकाचे व्यवस्थापन पाहिले.
“भोवतालचं जग जरी पुन्हा वेग पकडत असलं तरी मनात धाकधुक होतीच! लोकांच्या मनात सुद्धा कोरोनाची भीती अजून पक्की असताना, त्यातच गेल्या काही दिवसांपासून थंडी पडली असताना ऐन संध्याकाळी, मोकळ्या आकाशाखाली आमचा प्रयोग पाहायला लोक येतील का? असा प्रश्न मनात आला. पण आम्ही पक्का निश्चय केला होता की काहीही झालं तरी हा प्रयोग होणारच! या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. असे अनेक प्रयोग आता निळू फुले कला अकादमी मध्ये सादर होणार आहेत,” अशी माहिती या तरूण रंगकर्मींनी दिली.