पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे उजनी धरण भरले १०१ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 11:27 AM2020-09-01T11:27:04+5:302020-09-01T11:28:07+5:30
जिल्ह्यातील इंदापूर, बारामतीसह सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटणार
इंदापूर : पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले उजनी धरण सोमवारी १०१.३३ टक्के भरले आहे. यामुळे जिल्ह्यातील इंदापूर, बारामतीसह सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटणार आहे.संपूर्ण वर्षभर वरील तिन्ही जिल्ह्यांतील जवळपास पन्नासपेक्षा अधिक साखर कारखाने, पंधरा औद्योगिक वसाहती, अनेक नगर परिषदा, महानगरपालिका व गावांना या उजनीच्या पाणलोट क्षेत्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणाच्या पाण्यावर लाखो शेतकरी कुटुंबे, शेतमजूर आणि उद्योजकांचा प्रपंच अवलंबून आहे.
जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, वीर, नाझरे या धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने ही धरणे भरली असून, धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे सोमवारी उजनी धरण १०० टक्के भरले. मागील वर्षी ऑगस्ट सुरुवातीला उजनी धरण १०० टक्के भरून विसर्ग चालू होता. यंदा मात्र उजनी शंभर टक्के भरण्यास ऑगस्टअखेर उजाडला आहे.
उजनी धरणाची सद्य परिस्थिती
एकूण पाणीपातळी ४९६.९०० मीटर
एकूण पाणीसाठा ३३४३. ६२ दलघमी
( एकूण पाण्याचा टीएमसी ११८.०७ )
उपयुक्त पाणीसाठा १५४०.८१ दलघमी
(उपयुक्त पाण्याचा टीएमसी ५४.४१)
एकूण उजनी धरण भरलेली टक्केवारी १०१.५६ टक्के
_______________________________________
उजणीतून सोडलेला विसर्ग
*सिना - माढा उपसा सिंचन - २६२ क्युसेक
*भीमा सिना बोगदा - ९०० क्युसेक
*मुख्य कॅनॉल - ८०० क्युसेक
_______________________________________