उजनी धरण सिंचन व्यवस्थापन कोलमडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:43 AM2019-02-02T01:43:55+5:302019-02-02T01:44:40+5:30
राज्य सिंचन कर्मचारी संघटनेचे आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन
बिजवडी : सिंचन सहायक पदाची निर्मिती करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेच्या वतीने रविवारी (दि. ३) मुंबईत आझाद मैदानात होणाऱ्या राज्यस्तरीय बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये इंदापूर तालुक्यातील कर्मचारी ही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे उजनी धरणाच्या सिंचन व्यवस्थापना व पाणी पट्टी वसुलीचे नियोजन कोलमडून जाईल, असे चित्र निर्माण झाले आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सचिन मोहिते, दत्तात्रय कोळेकर अजित कदम यांनी सांगितले की, जलसंपदा विभागातील सर्व दप्तर कारकून, कालवा निरीक्षक व मोजणीदार या तीन ही पदांचे एकत्रीकरण करुन एकच सिंचन सहाय्यक हे पद निर्माण करावे, या पदावरील कर्मचाºयास २४०० रुपये ग्रेड वेतनश्रेणी लागू करावी, दरमहा तीन हजार रुपये प्रमाणे कायम प्रवास भत्ता पगाराच्या रकमेत जमा करावा, रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी आदी संघटनेच्या मागण्या आहेत. संघटना या मागण्यांचा पाठपुरावा करत आहे.
सिंचन सहाय्यक हे पद निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने उच्च स्तरीय अभ्यास गटाची नियुक्ती ही केली होती. उच्चस्तरीय समितीतील सदस्यांपैकी तीन सदस्यांनी २४०० रुपये ग्रेड वेतनश्रेणी लागू करणेबाबत शिफारस केली होती. शासनाकडे प्रस्ताव सादर करुन देखील टाळाटाळ होत आहे. सातव्या वेतन आयोगात ही कर्मचा-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.कालवा निरीक्षक,मोजणीदार व दप्तर कारकून या पदांवरील कर्मचा-यांना अन्यायकारक वेतनश्रेणीमुळे वषार्नुवर्षे नैराश्य आणि आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे,असे ते म्हणाले. आकृतीबंधानुसार असलेल्या पदांपेक्षा सव्वा पटीने कमी होत चाललेल्या कर्मचा-यांमध्ये सेवानिवृत्ती व इतर विभागांकडे वर्ग होण्यामुळे कर्मचाºयांची संख्या ही रोडावत चालली आहे. अतिरीक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले.