उजनीचा पाणीसाठा मायनसवर..! धरणात उपयुक्त पाणीसाठा उणे - ०.०३ टीएमसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:19 IST2025-04-19T15:18:01+5:302025-04-19T15:19:27+5:30
पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून उजनी धरणाची ओळख आहे

उजनीचा पाणीसाठा मायनसवर..! धरणात उपयुक्त पाणीसाठा उणे - ०.०३ टीएमसी
बाभूळगाव : पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण शुक्रवारी (दि.१८) सकाळी सहा वाजता मायनसमध्ये गेले आहे. उजनी धरणात आता उपयुक्त पाणीसाठा उणे -०.०३ टीएमसी तर मृत पाणीसाठा ६३.६२ टीएमसी एवढा आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी तसेच मुख्य कालवा आणि इतर पाणी योजनांद्वारे सहा हजार क्युसेक असा विसर्ग सुरू आहे त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.
पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर ५४ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवण क्षमतेच्या ६३.६२ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.
उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरण क्षेत्रात ठिकठिकाणी छोटी-मोठी बेटे उघडी पडली आहेत. उजनी धरणावर अवलंबून असलेल्या पाणी योजना, सिंचन योजना व औद्योगिकीकरणास पाणी पुरवठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे; मात्र दरवर्षी धरणातील मृतसाठ्यातील निम्म्याहून अधिक पाणीसाठा संपेपर्यंत पाणी वापरले जाते. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी पहिल्या आवर्तनानंतर दुसरे आवर्तन त्याचबरोबर आषाढी वारीसाठी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे समजते.
उजनी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून आणखी दोन ते अडीच महिने राहण्याची शक्यता आहे.
उजनी धरणाची शुक्रवारी सकाळी सहा वाजताची स्थिती:
एकूण पाणीपातळी १८०१.८३ दशलक्ष घनमीटर
उपयुक्त पाणीपातळी ०.९८ दशलक्ष घनमीटर
एकूण पाणीसाठा ६३.६२ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा ०.०३ टीएमसी
धरणात उपयुक्त पाणी साठा ०.०६ टक्के