उजनीचा वाद पून्हा पेटला! पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून निषेध आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:02 PM2021-05-19T18:02:15+5:302021-05-19T18:18:13+5:30
सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या गाड्या अडवून देणार जशास तसे उत्तर
बाभुळगाव: उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरच्या २२ गावांना देण्यासाठीचा निर्णय रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. पिपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंदापूरच्या पाण्यासाठी विरोध करणार्या सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचा रस्त्यावर टायर पेटवून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी बोलताना पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले की, इंदापूच्या पाणी प्रश्नांला विरोध करणार्या सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या गाड्या अडवून जशास तसे उत्तर दिले जाईल. तर जिल्ह्यातील भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाण्यासाठी पत्र देऊन विरोध दर्शवला. त्यांच्या या निर्णयाचे आम्हाला आश्चर्य वाटत आहे.
इंदापूर तालुक्याचे माजी लोकप्रतिनिधी व सध्याच्या भाजप नेत्यांकडे २० वर्षे मंत्रीपद असताना देखील २२ गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. परंतु दत्तात्रय भरणे यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याने त्याचे श्रेय भरणे यांना मिळू नये. यासाठी माजी लोकप्रतिनिधी मौन बाळगल्याचा आरोप संजय सोनवणे यांनी यावेळी केला आहे.
उजनी धरणातून लातुर व मराठवाड्यासाठी २१ टीएमसी पाण्याची तरतुद होत असताना सोलापूर जिल्ह्यातील एकाही नेत्याने विरोध केला नाही. परंतु इंदापूर तालुक्याच्या पाच टीएमसी पाण्यासाठीच सोलापूरकरांचा विरोध का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.