उज्ज्वला गॅसचा वापर केवळ ‘चहा’ साठीच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:10+5:30
स्वयंपाकासाठी सकाळ, संध्याकाळ चुली पेटवल्या जातात.
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : चुलीच्या धुरापासून गरीब व सर्वसामान्य महिलांची सुटका व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत पुणे जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४५ हजार ४१२ कुटुंबांना गॅस जोडणी देण्यात आली. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांना देखील यामध्ये गॅस सिलिंडर देण्यात आला. परंतु यापैकी तब्बल ६० टक्क्यांपेक्षा गॅस सिलिंडरचा वापर केवळ ‘चहा’साठीच होत असून, स्वयंपाकासाठी महिलांना सकाळ, संध्याकाळ चुली पेटवल्या जातात असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असून, या योजनेचा शुभारंभ १ मे २०१६ रोजी करण्यात आला होता. ग्रामीण भागात स्वयंंपाकासाठी आजही मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर केला जात आहे. यामुळे वायू प्रदूषणाबरोबर पर्यावरणाचाही -हास होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना चुलीवर जेवण करताना त्रास होतो. त्यामुळे श्वासाचेही आजर जडून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. यामुळे चुलीच्या धुरापासून महिलांची सुटका होण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अतंर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली. यामध्ये पहिले तीन महिने सवलतीच्या दरामध्ये गॅस सिलिंडर देण्यात आला. परंतु त्यानंतर संबंधित कुटुंबाला स्वखर्चाने गॅस सिलिंडर भरुन आणावा लागतो. त्यात गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती अनेक कुटुंबांना परवडणारी नाही.
पुणे जिल्ह्यातील तब्बल दीड लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. परंतु यापैकी ६० टक्क्यांपेक्षा अधिक कुटुंबामध्ये या गॅस सिलिंडरचे वाटप केवळ ऐनवेळी आलेल्या पै-पाहुण्यांना चहा करुन देण्यासाठीच होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे एकदा भरलेला गॅस सिलिंडर तब्बल दोन-तीन महिन्यांपेक्षा अधिक दिवस चालतो. परंतु उज्ज्वला गॅस सिलिंडर मिळालेले बहुतेक कुटुंब आजही सकाळ-संध्याकाळ चुलीवरच स्वयंपाक करत असल्याचे वास्तव आहे.
------------------
रॉकेलचा कोटा वाढून द्या
जिल्ह्यात ज्या कुटुंबाला उज्ज्वला गॅस सिलिंडरचा वाटप करण्यात आले अशा कुटुंबांना रॉकेलाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. परंतु उज्ज्वला गॅस सिलिंडर मिळाल्यानंतर ही बहुतेक कुटुंब चुलीवरच स्वयंपका करत असल्याने रॉकेलची मागणी कायम आहे. परंतु शासनाकडून जिल्ह्याचा रॉकेटला कोटा मात्र कमी केला आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तालुक्यासाठी अत्यंत कमी रॉकेलचा पुरवठा होत असून, यामध्ये वाढ करण्याची मागणी केली. ही परिस्थिती जिल्ह्यातील अन्य तालुक्यांची देखील आहे. परंतु गॅस सिलिंडरही परवडत नाही आणि रॉकेलही मिळत नाही यामुळे अनेक गरीब कुटुंबांची अडचण निर्माण झाली आहे.
-------------------------
जिल्ह्यात उज्ज्वला गॅस सिलिंडरचे तालुकानिहाय वाटप
आंबेगाव-११ हजार १७, बारामती-१२ हजार ४९२, भोर-५ हजार १६२, दौंड-११ हजार ४९८, हवेली - ३१ हजार ८२८, इंदापूर-२१ हजार ४५०, जुन्नर-१४ हजार ४२७, खेड-१० हजार ३७६, मावळ-६ हजार १३९, मुळशी-११ हजार ६, पुरंदर - ९ हजार ८३८, शिरुर- ८ हजार ६१६, वेल्हा-१ हजार ४६३, असे एकूण पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ लाख ४५ हजार ४१२ कुटुंबांना उज्ज्वला गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे.