उजनीचं धरण हाय रे भौ...कोकणातलं समुद्र नाय...!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 09:21 PM2018-10-01T21:21:17+5:302018-10-01T21:44:02+5:30
इंदापूर तालुक्यात उजनी धरणात उसळतात जेव्हा अचानक पाच फुटांच्या लाटा.. .यावेळी मासेमारी करणाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला..
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळील डिकसळ येथील कोंढार - चिंचोली रस्त्यावर जुन्या ब्रिटिशकालीन पुलाजवळ रविवार ( दि. ३०) रोजी दुपारी ४ वाजता अचानक वादळी वाऱ्यासह पाण्यात पाच फुटांच्या लाटा तयार झाल्याने मासेमारी करणाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला होता.यावेळी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाऱ्यामुळे समुद्रात भरतीच्या वेळी जशा लाटा उसळतात तशा प्रकारे मोठ्या लाटा उसळल्याने उजनी पाणीसाठ्याच्या फुगवट्याला समुद्रासारखे स्वरूप दिसून आले. या लाटा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
याठिकाणी लाटा नेहमीच उसळतात. मात्र, कालच्या लाटा उंचच्या उंच असल्याने व सुसाट्याचा वारा असल्याने लाटांचा वेग जोराचा दिसत होता.
अचानक आलेल्या लाटांमुळे मासेमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही मासेमारी करणाऱ्या बोटी लाटांमध्ये अडकल्याने त्यामधील लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने पाहणाऱ्या नागरिकांचा थरकाप उडत होता. मात्र त्यांनी कौशल्यपूर्ण नावेला हाताळत व आपला जीव संभाळत पाण्याबाहेर किनाऱ्याला आले. व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
यामुळे दिसणाऱ्या या विध्वंसक लाटा नंतर सर्वांना मनमोहक दिसले असे काही मासेमारांनी सांगितले.
__________________________________________