सूस घनकचरा प्रकल्प बंद करण्याचे अल्टिमेटम; चंद्रकांत पाटलांचा पुणे महापालिकेला इशारा

By राजू हिंगे | Updated: April 3, 2025 15:17 IST2025-04-03T15:17:08+5:302025-04-03T15:17:59+5:30

महापालिका प्रशासन अडचणीत सापडले असून, प्रकल्प बंद झाला तर कचरा जिरवायचा कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे

Ultimatum to close Soos solid waste project Chandrakant Patil warns Pune Municipal Corporation | सूस घनकचरा प्रकल्प बंद करण्याचे अल्टिमेटम; चंद्रकांत पाटलांचा पुणे महापालिकेला इशारा

सूस घनकचरा प्रकल्प बंद करण्याचे अल्टिमेटम; चंद्रकांत पाटलांचा पुणे महापालिकेला इशारा

पुणे: सूस घनकचरा प्रकल्प आजच बंद करा; नाहीतर या प्रकल्पाविरोधात खुर्ची टाकून बसावं लागेल, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला. यामुळे महापालिका प्रशासन अडचणीत सापडले असून, प्रकल्प बंद झाला तर कचरा जिरवायचा कुठे? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

या प्रकल्पात जवळपास १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. प्रकल्प बंद झाला तर परिसरातील नागरिकांची अडचण होणार आहे. याकडेदेखील राजकीय नेते लक्ष देणार का? असा सवाल केला जातो. सूस रस्त्यावरील ओल्या कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प बंद करण्याची सातत्याने मागणी होत आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करून नांदे-चांदे येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जानेवारी २०२४ मध्ये झाला होता. त्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासोबत बैठक झाली. त्यात प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारणा केल्या आहेत.

प्रकल्प स्थलांतरित करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा ताब्यात आली नसल्याने स्थलांतर रखडले आहे. यावर लवकरच कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधत चंद्रकांत पाटील यांनी प्रकल्प बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

Web Title: Ultimatum to close Soos solid waste project Chandrakant Patil warns Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.