ससूनकडे अत्याधुनिक रक्त संकलन व्हॅन; पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यासाठी उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:56 PM2018-01-31T12:56:27+5:302018-01-31T12:58:57+5:30
ससून रुग्णालयाला अत्याधुनिक फिरत्या रक्त संकलन व्हॅन मिळाली असून त्यामुळे रक्त संकलन करण्याचा वेग वाढणार आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील विविध रक्तदान शिबिरांसाठी या व्हॅनचा वापर होईल.
पुणे : ससून रुग्णालयाला अत्याधुनिक फिरत्या रक्त संकलन व्हॅन मिळाली असून त्यामुळे रक्त संकलन करण्याचा वेग वाढणार आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील विविध रक्तदान शिबिरांसाठी या व्हॅनचा वापर होईल.
रोटरी क्लब आॅप पुणेतर्फे ही व्हॅन रुग्णालयाला भेट देण्यात आली आहे. क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय गाडगीळ यांच्या हस्ते रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे ही व्हॅन सुपूर्द करण्यात आली. यावेळी प्रकाश तेलंग, अरविंद बहुले, डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. शैला पुराणिक, डॉ. मंगेश सांगळे, डॉ. नलिनी कडगी, डॉ. सोमनाथ सलगर आदी उपस्थित होते. ही व्हॅन पूर्णपणे वातानुकूलित असून रक्तदात्याचे रक्त संकलन करण्याची संपूर्ण सोय आहे.
एकाचवेळी दोन रक्तदात्यांचे रक्त या व्हॅनमध्ये घेता येऊ शकते. एकूण २०० रक्त पिशव्या साठविणे व आवश्यक तापमान राखण्याची सुविधा असलेले दोन रेफ्रिजरेटर आहेत.
रक्तदानानंतर रक्तदात्यासाठी आवश्यक शीतपेयांसाठी घरगुती फ्रीज, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून वॉश बेसिन, केमिकल टॉयलेट, शॉवर आदींची सुविधा आहे. आरोग्य शिक्षण व रक्तदानाबद्दल जनजागृतीसाठी व्हॅनमध्ये एलसीडी टीव्ही, माईक व ध्ननीप्रेक्षपक यंत्रणा बसविली आहे.
२४ हजार युनिट रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट
व्हॅनमुळे ससून रक्तपेढी अधिक सुसज्ज होणार आहे. रक्त संकलनाची क्षमता वाढल्यामुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचण्यास मोलाची मदत होणार आहे. २०१७ मध्ये रक्तपेढीतर्फे सुमारे १८७ रक्तदान शिबिरे घेतली. त्याद्वारे सुमारे १४ हजार ५०२ युनिट रक्त संकलित केले. २०१८ मध्ये २४ हजार युनिट रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट आहे, असे या वेळी डॉ. अजय चंदनवाले म्हणाले.