भाजपमुळेच उमाजी नाईक यांचे नाव महापुरुषांच्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:15 AM2021-09-14T04:15:02+5:302021-09-14T04:15:02+5:30
शिरूर : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव महापुरुषांच्या यादीत घेण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री ...
शिरूर : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव महापुरुषांच्या यादीत घेण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, रामोशी बेडर समाजाच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पक्ष समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
शिरूर येथील साई गार्डन मंगल कार्यालय येथे जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे, मित्रपरिवार व शिरुर तालुका जय मल्हार क्रांती संघटनेचे वतीने आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक २३० वी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर बोलत होते. या कार्यक्रमात आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक २३० वी जयंतीनिमित्त राष्ट्रगीताने मानवदंना देण्यात आली.
कार्यक्रमास माळशिरसचे आमदार राम सातपुते, सातारा कोरेगाव चे आमदार महेश शिंदे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा संपर्कप्रमुख धर्मेंद्र खांडरे, उद्योग आघाडीचे संजय पाचंगे, भाजप शिरुर तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय जाधव, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब मदने, कार्याध्यक्ष दीपक चव्हाण, संपर्कप्रमुख संतोष चव्हाण, शिरूर तालुकाध्यक्ष मच्छिंद्र बोडरे, युवकचे तालुकाध्यक्ष संतोष मदने, शिरूर शहराध्यक्ष दिनेश चव्हाण उपस्थित होते.
प्रवीण दरेकर म्हणाले की, येथील लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना धमक्या देण्यापेक्षा साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे दिलेत का, असा सवाल त्यांनी केला. बैलगाडा शर्यतीचे गुन्हे मागे घेऊ म्हणून राज्याचे गृहमंत्री यांनी पंधरा दिवसांचा अल्टिमेट दिला होता त्याचे काय झाले. राज्यात व पुणे जिल्हा या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, महिलांवरील अत्याचारातही मोठी भर पडली आहे. याकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले .
यावेळी दौलत नाना शितोळे म्हणाले की, रामोशी बेडर समाजाला दिलेले आरक्षण या सरकारने रद्द केल्यामुळे हे यापुढील काळात हे आरक्षण आंदोलन करून परत मिळविण्यासाठी समाजाने तयार राहावे, असे आवाहन करून राज्यात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करीत असताना शिरुरमधील हे पहिले वर्ष असून यापुढील काळात दरवर्षी शिरुर शहरात जयंती साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, योगेश टिळेकर, आमदार राम सातपुते, महेश शिंदे यासह मान्यवरांनी आपले विचार मांडले. उपस्थितांचे आभार भाजपा शिरूर तालुकाध्यक्ष दादा पाटील-फराटे यांनी मानले.
१३ शिरुर
रामोशी ,बेरड समाजाचे प्रतीक घोंगडी व कुऱ्हाड देऊन प्रवीण दरेकर यांचा सत्कार करण्यात आला.