गडकिल्ले जतन व संवर्धन समितीत उमेश झिरपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:23+5:302021-07-04T04:08:23+5:30
पुणे : राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यात ...
पुणे : राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असून, समितीत एकूण २४ सदस्यांचा समावेश आहे. या समितीमध्ये गिरिप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांचा आमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसोबत संबंधित क्षेत्रातील अनेक मान्यवर या समितीचा भाग असून गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन व शाश्वत विकास यासाठी समिती काम करणार आहे. झिरपे यांच्या गेल्या ४० वर्षांचा गिर्यारोहण, ट्रेकिंग व दुर्गसंवर्धनातील अनुभव व गिर्यारोहणातील व्यवस्थापन कौशल्य यासाठी कामी येणार आहे.
समितीची संकल्पना जुन्नर येथील सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने मांडली होती. ती प्रत्यक्षात आली. समितीने याबाबतचे पत्र १२ फेब्रुवारी २०२० ला मुख्यमंत्र्यांना दिले होते.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करणे, तसेच किल्ल्यासभोवतालच्या परिसरात पर्यटकांसाठी सुविधा पुरविणे, याचबरोबर जैवविविधता जपण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे.
फाेटो - उमेश झिरपे