उनाड स्टंटबाजांचा उपद्रव

By admin | Published: May 8, 2017 02:43 AM2017-05-08T02:43:13+5:302017-05-08T02:43:13+5:30

सध्या मावळात स्पोटर््स व मॉडिफाय दुचाकी वाहनांची क्रेज वाढली आहे. एकेकाळी एखाद दुसरी दिसणारी एक रुबाबदार

Unadmitted Stunts | उनाड स्टंटबाजांचा उपद्रव

उनाड स्टंटबाजांचा उपद्रव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कामशेत : सध्या मावळात स्पोटर््स व मॉडिफाय दुचाकी वाहनांची क्रेज वाढली आहे. एकेकाळी एखाद दुसरी दिसणारी एक रुबाबदार, वजनदार दुचाकी आत्ता दर पाच मिनिटांनी रस्त्यावरून जाताना दिसते. याचबरोबर इतर मॉडिफाय दुचाकीही दिसू लागल्या आहेत. काही खोडसाळ तरुण या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये ठरावीक बदल करून मिस फायरिंगच्या नावाखाली फटाक्यासारखे कानठळ्या बसविणारे आवाज काढत आहेत. त्यामुळे जवळून जाणारे इतर वाहनचालक दचकून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मावळासह कामशेतमध्ये दिवसभर फटाक्यांसारखे भयंकर आवाज होत असतात. अलीकडेच येथे नागरिकांबरोबर झालेल्या चर्चासत्रात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनीही सांगितले की, मावळात वजनदार दुचाकींचे प्रमाण वाढले आहे. त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना मॉडिफाय वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. पण, पोलिसांकडून ठरावीक वाहनांवरच कारवाई होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. शहरात सध्या वजनदार दुचाकी व इतर स्पोर्टबाईकची क्रेझ वाढली असून सुसाट निघालेल्या तरुण पिढीतील काही उनाड व टवाळखोर मुलांकडून या वाहनांचा वेगळ्या कारणासाठी उपयोग होत आहे. सायलेन्सरमध्ये विशिष्ट फेरबदल करून मिसफायरिंगच्या नावाखाली फटाक्यांच्या स्फोटासारखे आवाज काढले जातात. वाहतूक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. दुचाकींवर वेगवेगळे स्टंट करणे, दुचाकी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून भरधाव चालवणे, पादचाऱ्यांना कट मारणे या सारख्या प्रकारांमुळे नागरिक हैराण झाले असून रस्त्यावरून जाणारे इतर वाहनचालक दचकून बाजूला होत आहेत. पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. शहरातील विद्यालय, शाळा, खासगी क्लासच्या भरण्या व सुटण्याच्या वेळेत या टवाळखोर मुलांना जास्तच चेव चढतो.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर अनेक खासगी दवाखाने आहेत. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे तसेच वातावरणात बदल होऊन बहुतांश दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी असते. काही उनाड मुलांच्या दुचाकीमधून निघणाऱ्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने रुग्ण त्रस्त होत असल्याची अनेक डॉक्टर तक्रार करीत आहेत. कामशेत हे मध्यवर्ती शहर असल्याने येथे नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यात दुचाकीच्या फायरिंगमधून मोठ्याने आवाज काढून वाहने वेगात चालवणाऱ्या या उनाड मुलांवर ठोस कारवाई कधी होणार अशी सर्व स्तरावरून विचारणा होत आहे. याशिवाय शहरात अनेक अल्पवयीन मुले विनापरवाना दुचाकी व चारचाकी वाहने बिनदिक्कतपणे चालवत असून या मुलांना पोलिसांची भीती राहिली नाही,असे बोलले जाते. अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने देऊन स्वत:च्या मुलांच्या व इतरांच्या जीवाशी खेळ करत आहेत.

पोलिसांचे दुर्लक्ष : कारवाईची गरज

वडगाव मावळ येथे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन वाहनचालकाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला असून, मावळातील ही पहिलीच कारवाई होत असल्याचे बोलले जात असतानाच कामशेत शहरात अनेक उनाड, अल्पवयीन, विनापरवाना वाहन चालवणाऱ्या मुलांवर कधी कारवाई होणार अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे. याशिवाय काही अपंग, एक हात नसलेले नागरिक आपल्या मुलाला दुचाकीचा ताबा देऊन दुसऱ्या हाताने वाहन हाकत असल्याचे गंभीर प्रकार घडत असतात. हे पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही असा आरोप अनेक जागरूक नागरिक व व्यापारी करत आहेत.

Web Title: Unadmitted Stunts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.