पालिकेचेच अनधिकृत बांधकाम

By admin | Published: June 6, 2016 12:54 AM2016-06-06T00:54:47+5:302016-06-06T00:54:47+5:30

शहरातील अनेक इमारतींमध्ये वाहनतळाच्या जागेचा सर्रासपणे व्यावसायिक वापर सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करायचे सोडून महापालिकेनेही त्यांचीच री ओढत स्वत:च्याच वाहनतळाच्या जागेत बेकायदा बांधकाम सुरू केले

Unauthorized construction of the corporation | पालिकेचेच अनधिकृत बांधकाम

पालिकेचेच अनधिकृत बांधकाम

Next

पुणे : शहरातील अनेक इमारतींमध्ये वाहनतळाच्या जागेचा सर्रासपणे व्यावसायिक वापर सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करायचे सोडून महापालिकेनेही त्यांचीच री ओढत स्वत:च्याच वाहनतळाच्या जागेत बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. महापालिकेच्या वाहनतळात जागा नसल्यामुळे अनेक अधिकारी व पदाधिकाऱ्यांची वाहने कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात किंवा थेट रस्त्यावर लावली जात असताना पालिकेने असे बांधकाम करून आपल्या वाहनतळाची जागा कमी केली आहे, हे विशेष!
महापालिकेच्या मुुख्य इमारतीत दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र दुमजली वाहनतळ आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेले, की डाव्या बाजूला असलेल्या जागेत अधिकारी, नगरसेवक यांची चारचाकी वाहने लावली जातात. मुख्य इमारतीसमोरच्या आवारात पदाधिकाऱ्यांची वाहने असतात. पदानुसार फलक लिहून त्यांच्या जागा निश्चित केल्या आहेत. अधिकारी, नगरसेवक यांची वाहने लावली जातात त्या जागेत बेकायदा बांधकाम केले जात आहे. पालिकेच्या मागील प्रवेशद्वारालगत यात काही खोल्या काढण्यात आल्या आहेत.
वरच्या मजल्यावरील वाहने खाली आणण्यासाठी एक मोठा उतार या वाहनतळाला आहे. त्याच्या खालील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत याआधीच पालिकेने वीटकाम करून पक्के बांधकाम केले आहे. त्यात एका खोलीत विद्युत विभागाची स्टोअररूम व एका खोलीत कार्यालय आहे. आता त्याच्याबरोबर समोरच्या मोकळ्या जागेत पुन्हा काही खोल्या बांधण्यात येत आहेत. त्याही पक्क्या बांधकामाच्याच असून, त्यांना खिडक्या वगैरे काढण्यात आल्या आहेत. तिथेही काही कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या बांधकामात वाहनतळाची बरीच मोठी जागा गेली असून, उजेड येण्यासाठी ठेवलेली मागील मोकळी जागाही भिंत बांधून बुजवल्यामुळे वाहनतळात अंधार निर्माण झाला आहे.
शहरातील अनेक इमारतींच्या वाहनतळात हॉटेल, लहान उपाहारगृहे, दुकाने सुरू आहेत. त्यामुळे त्या-त्या ठिकाणची वाहने रस्त्यावर लावली जातात व वाहतुकीची कोंडी
निर्माण होते.
अशा बेकायदेशीर बांधकामांना नोटीस देऊन ती पाडून टाकायची जबाबदारी पालिकेचीच आहे.
त्याकडे पालिकेचे पूर्ण दुर्लक्षच झाले आहे. एखादा अपवाद वगळता अशी नोटीस बजावल्याचे उदाहरण बांधकाम विभाग किंवा अतिक्रमणविरोधी विभागात सापडत
नाही. ते करायचे सोडून
उलट पालिकाच आता त्या प्रकारचे बेकायदा बांधकाम करीत आहे.
(प्रतिनिधी)

पालिकेच्याच नियमानुसार वाहनतळाच्या जागेत कसलेही बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. तरीही पालिकाच बांधकाम करीत आहे. ही जागा कमी पडत असल्यामुळे अनेक अधिकारी तसेच नगरसेवकांची वाहने पालिकेसमोरच्या रस्त्यावर लागतात. त्यामुळे बऱ्याचदा या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. वाहनतळाच्या जागेत पालिकेने केलेल्या बांधकामामुळे आता आधीच अपुरी असलेली जागा आणखीनच कमी झाली आहे. त्यामुळे पालिकेत येणाऱ्या व जागा नसल्यामुळे रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढेल.
कारण काही का असेना, जागेचा असा बेकायदा वापर करणे चुकीचे आहे. तो करणाऱ्यांवर कडक कारवाई करून आदर्श निर्माण करण्याऐवजी पालिकाच आता असे बांधकाम करीत असेल, तर ते योग्य नाही. आयुक्तांनी याची दखल घ्यावी.
- संजय बालगुडे, नगरसेवकपालिकेच्या मुख्य इमारतीच्या मागे नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे. त्यासमोरच्या जागेत काही कार्यालये होती. ती तिथून हलवणे आवश्यक होते; मात्र त्यातील टपाल कार्यालय, एटीएम तसेच विद्युत विभाग अशा कार्यालयांची कामासाठी गरजही होती. त्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात ती वाहनतळाच्या जागेत हलवण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी बांधकाम सुरू आहे. ते तात्पुरते आहे व नवी इमारत झाल्यानंतर लगेचच काढले जाईल.
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता

Web Title: Unauthorized construction of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.