दुरूस्तीच्या नावाखाली मार्केट यार्डात आडत्यांकडून अनधिकृत बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:21+5:302021-05-24T04:10:21+5:30
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुरूस्तीच्या नावाखाली आडत्यांकडून अनधिकृत बांधकाम केले जात ...
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुरूस्तीच्या नावाखाली आडत्यांकडून
अनधिकृत बांधकाम केले जात आहे. भुसार बाजारातील एका आडत्याने वेल्डिंच्या नावाखाली अनधिकृतपणे साईड पट्टीत वाढीव खोल्यांचे बांधकाम सुरू केले आहे. ही बाब लक्षात येताच समिती प्रशासनाने संबंधित बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आहेत.
मार्केट यार्डातील भुसार विभागातील भूखंड वाटप केल्यानंतर त्यावर बांधकामासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मात्र, भुसार विभागात महापालिकेच्या परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बांधकामे यापूर्वीच झाली आहेत. तर, महापालिकेने दिलेल्या प्रत्यक्ष परवानगीशिवाय अतिरिक्त बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. भुसार बाजारात भगत एंटरप्रायझेस भूखंड क्रमांक ३७१ येथे संबंधित भूखंडधारकाने समितीकडून गाळ्याच्या संरक्षणासाठी वेल्डिंगच्या कामाची परवानगी घेतली. मात्र, प्रत्यक्षात साईडपट्टीत खोल्यांचे बांधकाम सुरू केले. साईडपट्टी मोकळी ठेवण्याचा निर्णय असताना प्रत्यक्षात तेथेही बांधकाम केल्याचे दिसून येत आहे.
--------
प्रशासनाकडून होणार कारवाई
बाजार समिती प्रशासनाने भूखंडधारकाला वेल्डिंगच्या कामाची परवानगी दिली होती. प्रत्यक्षात तेथे वाढीव काम केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित भूखंडधारकास वाढीव काम दोन दिवसांत पाडण्याचे आदेश दिले आहे. दोन दिवसांत बांधकाम न हटविल्यास समिती स्वत:च हे बांधकाम पाडेल.
- नितीन रासकर, भुसार बाजार प्रमुख