बारामतीत अनधिकृत बांधकामांचे पेव
By Admin | Published: April 11, 2017 03:48 AM2017-04-11T03:48:47+5:302017-04-11T03:48:47+5:30
नगरपालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर बांधकामांनी चांगलाच जोर धरला आहे. विशेषत: नगरपालिकेच्या वाढीव हद्दीतील उपनगरांमध्ये असे प्रकार राजरोसपणे होत आहेत.
बारामती : नगरपालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर बांधकामांनी चांगलाच जोर धरला आहे. विशेषत: नगरपालिकेच्या वाढीव हद्दीतील उपनगरांमध्ये असे प्रकार राजरोसपणे होत आहेत. पालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रारी झाल्यावर फक्त स्थळ पाहणी केली जाते. नोटिसा दिल्या जातात. जागेवरच कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बांधकाम करणारे अधिक वेगाने काम पूर्ण करण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे. विशेषत: नगरपालिकेने क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र, क्षेत्रीय अधिकारी नेमके करतात काय, या बेकायदा बांधकामांना ‘प्रोत्साहन कोणाचे,’ असा प्रश्न विचारला जात आहे.
बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहनच मिळत असल्याचे चित्र आहे. या बांधकामांना कर आकारणी करताना शास्ती लावायची, असा एकच संकेत आहे. त्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या नागरीकरणामुळे येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची, याची प्रशासनालादेखील चिंता नाही. जागामालक अगदी रस्त्याला लागून बांधकाम करतात. त्यामुळे रस्ते अरुंद होतात. एकाने अतिक्रमण केले की, त्यांच्या शेजारचादेखील त्याचेच अनुकरण करतो. बारामती सत्र न्यायालय ते एमआयडीसी पेन्सील चौकापर्यंत भिगवण रस्त्याला लागून नगरपालिकेने नव्याने सेवारस्ता केला आहे. या सेवारस्त्याला लागूनच ‘टोलेजंग’ इमारती ‘विनापरवाना’ उभ्या राहिल्या आहेत. अगदी प्रमाणापेक्षा जादा ‘एफएसआय’ वापरून बेकायदेशीर इमारती उभ्या राहिल्या आहेत. या कामांच्या बाबत तक्रारी झाल्यावर नगरपालिका प्रशासनाकडून फक्त पाहणी आणि नोटिसा देण्याचे काम केले जात आहे. या नोटिसांमुळे काम थांबवण्याऐवजी ‘अधिक गतीने काम’ केले जात आहे. या मागचे गौडबंगाल काय, ते कळतच नाही. भिगवण रस्त्यालगतच सेवारस्त्याला लागून सहयोग सोसायटीसमोर असलेल्या एसटी कर्मचारी सोसायटीत सर्व नियम धाब्यावर बसवून टोलेजंग इमारतीचे काम सुरू आहे. या कामाबाबतदेखील पालिकेत तक्रारी झाल्यानंतर काम बंद होण्याऐवजी वेग वाढला आहे. त्यामुळे या पाठीमागे नेमके अभय कोणाचे, हा प्रश्न विचारला जात आहे. एकाने सर्व नियम धाब्यावर बसवून काम केले की, त्या लगतचा मिळकतधारकदेखील त्याच पद्धतीने काम करतो. त्यामुळे सार्वजनिक रस्ते अरुंद होत आहेत.
गुंठेवारीचा
प्रश्न कायम...
बारामती नगरपालिकेच्या हद्दीतच काही वर्षांपूर्वी गुंठेवारी पद्धतीने जागा विक्री झाली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती झाली आहे. या गुंठेवारी नियमितीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. शहरातील
अवचट इस्टेट, कसबा भागातील श्रीरामनगर, सिकंदर नगर, जामदार रोड, वणवे मळा यासह अन्य भागात गुंठेवारी नियमिततेचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. गुंठेवारी बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर कामे झाली आहेत. नगरपालिकेकडून त्यांना कर आकारणी केली जाते. परंतु, बांधकामे नियमित करावी, अशी मागणी या गुंठेधारकांची आहे.
धोरण निश्चित
करणार : देशमुख
या प्रकारच्या अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात नगरपालिका आता धोरण निश्चित करणार आहे. बांधकामाची परवानगी घेतल्यानंतर, त्याच आकारानुसार काम होत आहे का, याची स्थळपाहणी नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यामार्फत केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले.
एकत्रित आराखडा आवश्यक : गुजर
तर वाढीव हद्दीसह सर्वच भागात बांधकामे परवानगीनुसारच झाली पाहिजे, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याबरोबरच पदाधिकाऱ्यांचेदेखील लक्ष असले पाहिजे. स्थानिक नगरसेवकांनीदेखील याबाबत जागृत राहावे, तरच नियोजनबद्ध बांधकामे होतील. वाढीव हद्दीत त्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी पदाधिकारी आणि प्रशासन मिळून एकत्रित आराखडा तयार करतील, असे पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.