बीडीपी क्षेत्रात होणारी अनधिकृत बांधकामे तातडीने थांबवावीत; राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाणांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 10:44 PM2021-03-04T22:44:29+5:302021-03-04T22:44:46+5:30
पाषाण तलावातील वाढत असलेल्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला व तेथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.
पुणे - बीडीपी क्षेत्रात होणारी अनधिकृत बांधकामे तातडीने थांबवावीत अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची आज त्यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.
सध्या पुणे शहरात अनेक ठिकाणी टेकड्यांवर अनधिकृत टेकडीफोड व प्लॉटींगची कामे सरास चालू आहे व त्यावर कोणतेही कारवाई केली जात नाही. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार यासाठी महानगरपालिकेने बीट ऑफिसर नेमले आहेत परंतु ते त्यांची जबाबदारी निभावताना दिसत नाहीत असे खा. वंदना चव्हाण यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार दर ६ महिन्यांनी Satelite Image काढणे सर्व महानगरपालिकांना बंधनकारक आहे वारंवार हि मागणी करून देखील आजतागायत महानगरपालिकेकडून दिरंगाई झालेली दिसते. याची विचारणा खा. चव्हाण यांनी केली.
ज्या जागा BDP क्षेत्रांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या आहेत त्या लोकसह्भागातुन व विविध संस्थांच्या CER मधून विकसित, संवर्धित व हरित करण्याबाबत अनेक वेळेला मागणी करून देखील त्यावर कुठलेही पाऊल उचलले गेले नाही. टेकडीफोड व प्लॉटींग संदर्भात नागरिक तक्रारी करत असतात त्याचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेने एक खिड़की तक्रार निवारण केंद्र चालू करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. शहराचा विकास होत असताना अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नाले व नैसर्गिक जलस्त्रोत बुजवली आहेत किंवा राडारोडा टाकला आहे. महानगरपालिकेने सर्व नैसर्गिक जलस्त्रोतांचे यापूर्वी मपिंग केलेले असून नागरिकांच्या माहितीसाठी ते सार्वजनिक करावेत व या पद्धतिने होणारे अनधिकृत काम थांबवावे अशी सूचना खा. चव्हाण यांनी केली.
पाषाण तलावातील वाढत असलेल्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला व तेथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी खा. वंदना चव्हाण यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली. अनेक ठिकाणी राडारोडा व कचरा रस्त्याच्या दुतर्फा, नाले, तळे, हायवे, सार्वजनिक ठिकाणे आणि जेथे शक्य असेल तेथे टाकला जातो त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सदर बैठकीत करण्यात आली. यावेळेस Air Quality Report, निराधार भिक्षेकरी, COVID लसीकरणाबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली.