अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंगमुळे कोथरुड विद्रुप, चांदणी चौकापासून जागोजागी राजकीय जाहिरातबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:49 AM2017-09-21T00:49:31+5:302017-09-21T00:49:33+5:30
कोथरूड परिसरात मागील अनेक दिवसांपासून अनाधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स लावले जात आहे पालिका प्रशासनाने या बाबत फक्त बघ्याची भूमिका घेतली असून या भुमिकेबद्दल नागरिकांनी पालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कर्वेनगर : कोथरूड परिसरात मागील अनेक दिवसांपासून अनाधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स लावले जात आहे पालिका प्रशासनाने या बाबत फक्त बघ्याची भूमिका घेतली असून या भुमिकेबद्दल नागरिकांनी पालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी तर फ्लेक्समुळे सिग्नल सुध्दा दिसत नाही.
पश्चिम भागाचे प्रवेशव्दार म्हणून नागरीक चांदणी चौकाकडे पाहत आहेत. प्रशासनाने सगळीकडे दिशादर्शक फलक लावले आहेत .मात्र या फलकांवर आणि प्रमुख चौकात कोथरूडमधील संभाव्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी नियम पायदळी तुडवून फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्समध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा फोटो असल्याने अनाधिकृत फ्लेक्सना त्यांचाही पाठिंबा असल्याचे नागरीक सांगत आहेत. याठिकाणी साधारण पन्नास फ्लेक्स बेकायदा लावले गेले आहेत असे नागरिक सांगत आहेत.
सत्ता आली की कार्यकर्ते काहीही करू शकतात, याचा प्रत्यय प्रकार कोथरूडमध्ये नागरिकांना दिसत आहे. या अनधिकृत फ्लेक्सकडे लक्ष जाताना किंवा मोठ्या फ्लेक्सकडे पाहताना अनेक अपघात होत आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरीक विचारत आहेत.
या फ्लेक्सवरील उमेदवार विकासाची नवी ओळख सांगताना स्वत:चे ना्व पुढे करत आहेत, पण सत्ता हातात आल्यावर कोथरूड तसेच पौडरोडमधील बकालपणा हाच का विकास असा प्रश्न कोथरूडमधील नागरिकांना पडला आहे.
अनधिकृत फ्लेक्ससबंधी कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाचे आकाशचिन्ह विभागाशी सपंर्क साधला असता सपंर्क होऊ शकला नाही.