मार्केट यार्डातील अनधिकृत गोदामे धोकादायक, शेतीपूरकच्या नावाखाली अन्य व्यवसायांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:34 AM2018-04-03T04:34:42+5:302018-04-03T04:34:42+5:30

अनधिकृत गोदामांची मोठी संख्या.. मंजुरीपेक्षा अधिक बांधकाम करून वाढलेली जागा... शेतीपूरक व्यवसायाच्या नावाखाली किराणा दुकाने, उदबत्ती, बारदाण, थर्माकोल, प्लॅस्टिक अशा एक ना अनेक व्यवसायांना दिलेली परवानगी...

 Unauthorized godowns in the market yard are dangerous, in the name of agriculture, other businesses are allowed | मार्केट यार्डातील अनधिकृत गोदामे धोकादायक, शेतीपूरकच्या नावाखाली अन्य व्यवसायांना परवानगी

मार्केट यार्डातील अनधिकृत गोदामे धोकादायक, शेतीपूरकच्या नावाखाली अन्य व्यवसायांना परवानगी

Next

पुणे - अनधिकृत गोदामांची मोठी संख्या.. मंजुरीपेक्षा अधिक बांधकाम करून वाढलेली जागा... शेतीपूरक व्यवसायाच्या नावाखाली किराणा दुकाने, उदबत्ती, बारदाण, थर्माकोल, प्लॅस्टिक अशा एक ना अनेक व्यवसायांना दिलेली परवानगी... यामुळे वाढलेली गर्दी... सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव.. प्रचंड वाहतूककोंडी यामुळे मार्केट यार्डातील अनधिकृत गोदामांचा विषय ऐरणीवर आला आहे.
मार्केट यार्ड येथील नेहरू रस्त्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या समोरील गाळा क्र.७८ व ७९ च्यामध्ये असलेल्या जागेत अनधिकृत गोदाम तयार केलेले होते.
त्या गोदामामध्ये तळघर तयार
करून धान्यांसाठी लागणाऱ्या पोत्यांची (बारदाणा) साठवणूक केलेली होती. या गोदामाला
सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागून मोठे
नुकसान झाले. शेतीपूरक व्यवसाय म्हणून या बारदाणाच्या साठवणुकीसाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु या अशा अनधिकृत व्यवसायांना सध्या मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
गुलटेकडी येथील शिवछत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील बाजाराचे फळे-भाजीपाला-कांदा-बटाटा आवार आणि किराणा भुसार मालाचे आवार अशा दोन भागांत विभाजन
करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत या दोन्ही बाजारांत अतिक्रमणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. किराणा भुसार मालाच्या बाजारात अनेक टपरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते व शेतीशिवाय अन्य अनेक व्यवसायाची दुकाने, साठवणूक येथे करण्यात येत आहे. तसेच लोकसंख्येमुळे येथील व्यापाºयांची संख्यादेखील वाढली असून, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचे नियोजन केल्यास व अतिक्रमणे हटविल्यास येथील अनेक प्रश्न मार्गी लागतील.

बेकायदेशीर धंदे जोमात
मार्केट यार्ड परिसरात बेकायदेशीर धंदे सुरू आहेत.
जागोजागी दारूची सर्रास विक्री केली जाते. यामुळे देखील येथील व्यापाºयांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.

मार्केट यार्ड परिसरातील रस्त्यांची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामध्ये सर्व्हिस रस्ते तर खूपच खराब झाले आहेत. यामुळे येथे नियमित वाहतूककोंडी होत असून, किराणा भुसार बाजारातील व्यापाºयांना यांचा त्रास होतो. बाजार समिती प्रशासनाकडून वाहतूककोंडी, रस्त्यांची कामे यावर उपाययोजना सुरू आहेत. याचसोबत सर्व्हिस रस्त्यांची कामे केल्यास वाहतूककोंडीतून मुक्तता होऊ शकते. - प्रवीण चोरबेले, नगरसेवक, मार्केट यार्ड

वाहतूककोंडी, कचरा, रस्ते आदी विविध प्रश्न सोडविण्यासाठी बाजार समितीच्या वतीने व्यापारी, आडते, हमाल पंचायत, प्रशासकीय अधिकारी आदी सर्वांचा समावेश असलेली सुकाणू समिती नुकतीच स्थापन केली आहे. यामुळे गेल्या एक-दीड महिन्यात वाहतूककोंडी व इतर गोष्टी मार्गी लागतील. - पोपटलाल ओस्तवाल,
अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर

मार्केट यार्ड परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, बेकायदेशीर धंदे व अन्य गोष्टी सुरू आहेत. या सर्व गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी नुकतेच रुजू झालेले बाजार समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या सर्वांला व्यापाºयांनी सहकार्य केल्यास अनधिकृत धंदे रोखण्यास मदत होईल. - राजेश शहा,
माजी अध्यक्ष दि पूना मर्चंट्स् चेंबर

३० अनधिकृत परवाने रद्द
शेतीपूरक व्यवसाय म्हणून परवानगी दिलेले मार्केट यार्ड परिसरातील २५ ते ३० अनधिकृत परवाने नुकतेच रद्द करण्यात आले आहेत. रस्ते, वाहतूककोंडी अन्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यांत येथील सर्व अनधिकृत व्यवसाय व बेकायदेशीर धंदे बंद करू. - बी. जे. देशमुख, सचिव, मार्केट यार्ड

मार्केट यार्डातील गोदामाला आग

बिबवेवाडी : मार्केट यार्ड येथील पंडित नेहरू रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदामासमोरील एका गोदामाला आग लागून सर्व माल जळून खाक झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली. धान्य बाजारातील गाळा क्रं. ७८ व गाळा क्रं. ७९ यांच्यामधील जागेत तयार केलेल्या पोत्यांचे गोदाम होते. आग लागल्यानंतर शेजारील गाळेधारकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता आग अजूनच भडकली. अग्निशमन दलाने एक तासात आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु गोदामाच्या खाली अनधिकृतरीत्या तयार केलेल्या तळघरातसुद्धा आग पसरल्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने तळघरातील गोदामाची भिंत तोडून त्यावर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसून शेजारील गाळ्यांना मात्र आगीची झळ बसली.

गोदामाचा परवाना संपलेला होता
मार्केट यार्ड कमिटीचे प्रशासकीय अधिकारी बी. जे. देशमुख म्हणाले, गोदामाचा
परवाना ३१ मार्चला संपलेला असून,
संबंधित गोदामधारकास परवाना संपल्यामुळे गोदामे रिकामे
करण्यास सांगितले होते. परंतु, त्याने ते रिकामे केले नाही.

Web Title:  Unauthorized godowns in the market yard are dangerous, in the name of agriculture, other businesses are allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे