राजगुरुनगर शहरात खुलेआम अवैध धंदे

By admin | Published: May 20, 2017 05:05 AM2017-05-20T05:05:25+5:302017-05-20T05:05:25+5:30

राजगुरुनगर शहरात अवैध मटका व्यवसाय व गावठी दारूधंदा खुलेआम सुरू आहे. पोलीस सोयीस्करपणे काणाडोळा करीत आहे. सगळीकडे मटका, दारूधंदे

Unauthorized illegal activities in the city of Rajgurunagar | राजगुरुनगर शहरात खुलेआम अवैध धंदे

राजगुरुनगर शहरात खुलेआम अवैध धंदे

Next

- राजेंद्र मांजरे । लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : राजगुरुनगर शहरात अवैध मटका व्यवसाय व गावठी दारूधंदा खुलेआम सुरू आहे. पोलीस सोयीस्करपणे काणाडोळा करीत आहे. सगळीकडे मटका, दारूधंदे बंद आहे; मात्र राजगुरुनगर शहरात बाजार समिती आवारात व लगत हे धंदे मात्र तेजीत असल्याचे चित्र दिसत
आहे. त्यांच्यावर कारवाई केली
जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मटका व्यवसाय व गावठी दारू बंद करण्याची मागणी राजगुरुनगर शहरातील नागरिकांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत दारूविक्रीला बंदी घालण्यात आल्याने कायदेशीर बिअरबारमधील मिळणारी दारूविक्री एक एप्रिलपासून बंद झाली; मात्र छुप्या पद्धतीने अवैध पद्धतीने दारूविक्रीचा काळाधंदा तालुक्यात जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक देशी व विदेशी दारूविक्रीचा धंदा करणाऱ्या मंडळींनी छुप्या पद्धतीने चढ्या दराने दारू विक्री करीत आहे.राजगुरुनगर शहरात खुलेआम मटका व्यवसाय व गावठी दारूची विक्री होत आहे. पोलीस आणि मटकाचालक यांच्या संगनमताने हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. चाकण आणि राजगुरुनगरसह कडूस, चास, आळंदी परिसरात मटका व्यवसाय चालत असल्याचे सांगितले जातेय. मटक्याचा जुगार खेळणारांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढल्याने या व्यवसायाची चलती आहे. तसेच, दारू व जुगर मटका यामुळे अनेक घरांत कलह वाढले आहेत, झटपट पैसे मिळविण्याच्या हेतून तरुण आणि प्रतिष्ठित नागरिक या व्यवसायाकडे वळले आहेत.
राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या खेड कृषी उ. बाजार समितीच्या मागील बाजूस तसेच आवारात मटका व्यवसाय सुरू असून गावठी दारू विक्री फुग्यात मिळत आहे. झाडाखाली खुर्ची टाकून मटक्याचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे.तसेच एक गावठी दारूविक्रेता दुचाकीवर चांडोली येथून आणून दिवसभर गावठी दारू प्लॅस्टिक पिशवीत आणून (फुगा) सर्रास विक्री करत आहे. यामध्ये रोज लाखो रुपायांची उलाढाल होते. बाजार समितीच्या आवारात कायम तळीरामाचा अड्डा असतो. या परिसरात सर्वत्र रिकाम्या दारूच्या बाटल्या व गावठी दारु रिकाम्या झालेल्या पिशव्या पडल्या आहेत. याचा त्रास कामानिमित्त बाजार समिती आलेले तालुक्यातील शेतकरी सर्वसामन्य नागरिक आणि महिला वर्गाला येथे होत आहे. हे मटक्याचे अड्डे धनदांडगे यांचे असल्याने कोणीही पोलिसांत तक्रार देत नाही. खुलेआम चालणारा मटका जुगार व्यवसाय व गावठी दारू विक्री बंद करावी, अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे शासन अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी कायदा करते, त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही याबाबत मात्र सखोल चौकशी होत नाही. त्यामुळे अशा धंद्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

खेड तालुक्यातील माझ्या शेतकऱ्यांच्या संस्थेच्या ठिकाणी असे काही गैरप्रकार होत असेल, तर तत्काळ चौकशी करू. अवैधरीत्या मटका व गावठी दारूविक्री व्यवसायवर बाजार समितीकडून कारवाई करण्यात येईल.- नवनाथ होले, सभापती,
कृषी उ. बाजार समिती, खेड

राजगुरुनगर शहरात
मटका व गावठी दारूविक्री सुरू असेल तर त्याची खात्री करून कारवाई करण्यात येईल. खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांना जाण्यास सांगितले आहे.
- राम पठारे
(उपविभागीय पोलीस
अधिकारी, खेड )

अवैध धंद्यांसंदर्भात माहिती मिळाल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल. संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देण्यात येईल. काही दिवसांनंतर जिल्ह्यात गावागावांत दारुबंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामसुरक्षा दल स्थापन करून ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून अवैध दारूविक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- सुवेझ हक, अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस

Web Title: Unauthorized illegal activities in the city of Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.