राजाश्रयामुळे बळावतोय अनधिकृत व्यवसाय
By admin | Published: June 1, 2015 05:38 AM2015-06-01T05:38:06+5:302015-06-01T05:38:06+5:30
गेल्या काही दिवसांपासून महात्मा फुले मंडई परिसर अनधिकृत पथारी व्यावसायिक, अतिक्रमण कारवाई व प्राणघातक हल्ल्यामुळे चर्चेत आहेत
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महात्मा फुले मंडई परिसर अनधिकृत पथारी व्यावसायिक, अतिक्रमण कारवाई व प्राणघातक हल्ल्यामुळे चर्चेत आहेत. त्यामुळे ‘लोकमत’ प्रतिनिधींनी मंडई, तुळशीबाग, शिवाजी रस्ता, विश्रामबाग, लक्ष्मी रस्ता व अप्पा बळवंत चौक (एबीसी) या परिसरात रविवारी सायंकाळी स्टिंग आॅपरेशन केले. त्या वेळी राजाश्रय असलेल्या अनधिकृत पथारी व्यावसायिकांना ‘अभय’ मिळत असल्याचे निदर्शनास आले.
दोन आठवड्यांपूर्वी मंडई व तुळशीबाग परिसरात विके्रत्यांच्या जागेवरून वाद झाला होता. त्या वेळी एकमेकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार घडला होता. त्या वेळी नगरसेविका रूपाली पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अतिक्रमणांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या प्रशासनाने शहरातील प्रमुख शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, सिंहगड रस्ता, लक्ष्मी रस्ता व मंडई परिसरात धडक कारवाई सुरू केली.
दरम्यान, महापालिकेतील ज्या सर्वपक्षीय गटनेत्यांनी अतिक्रमण कारवाईची मागणी केली होती, तेच आता कारवाई थांबविण्याची मागणी करू लागले आहेत. त्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव आणला जात आहे. मात्र, आयुक्त कुणाल कुमार यांनी दबावाला न जुमानता अतिक्रमण विभागाला अनधिकृत पथारी व्यावसायिक व विके्रत्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रशासनाकडून अनधिकृत ऐवजी अधिकृत व परवानाधारक पथारी व्यावसायिकांवरच कारवाई केली जात असल्याचा दावा नगरसेवक करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शहरातील वर्दळीची ठिकाणे असलेली मंडई परिसरातील विविध चौक व रस्त्यांवर पुस्तके, मासिके, सीडी व बांगड्या विकण्याचा प्रयोग रविवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत केला. त्याचा आँखोदेखा हाल असा...