फर्ग्युसन रस्त्यावर अनधिकृत पार्किंग ; वाहतूकीला हाेताेय अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 07:29 PM2019-05-09T19:29:27+5:302019-05-09T19:47:49+5:30
पुण्यातला महत्त्वाचा तसेच सदैव गजबजलेला असणाऱ्या फर्ग्युसन रस्त्यावर अनधिकृतपणे कशाही पद्धतीने वाहने लावण्यात येत आहेत.
पुणे : पुण्यातला महत्त्वाचा तसेच सदैव गजबजलेला असणाऱ्या फर्ग्युसन रस्त्यावर अनधिकृतपणे कशाही पद्धतीने वाहने लावण्यात येत आहेत. या वाहनांमुळे वाहतूक काेंडी हाेत असून पाेलिसांकडून या वाहनांवर फारशी कारवाई हाेत नसल्याचे चित्र आहे.
फर्ग्यसुन रस्ता पुण्यातील महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर माेठी रहदारी असते. डेक्कन भागात अनेक महाविद्यालये, कार्यालये तसेच खरेदीची ठिकाणे असल्याने या रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक असते. त्यातच महानगरपालिकेकडून स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या शुशाेभिकरणाचे काम सुरु आहे. यात फुटपाथची लांबी वाढविण्यात येत आहे. तसेच वाहने लावण्यासाठी पार्किंगची जागा तयार करण्यात येत आहे. या नव्या प्रकारच्या फुटपाथमुळे रस्ता वाहतूकीस लहान पडत आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी या रस्त्यावर वाहतूक काेंडी हाेत आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले हाेते. आचरसंहितेमुळे काम थांबविण्यात आले. परंतु ताेपर्यंत रस्ते खाेदून ठेवले असल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहनचालक खाेदलेल्या रस्त्याच्या बाजूलाच वाहने लावत आहेत. त्यामुळे वाहतूकीसाठी आधीच अरुंद झालेला रस्ता आणखीनच अरुंद हाेत आहे. या वाहनचालकांवर वाहतूक पाेलिसांकडून फारशी कारवाई हाेताना दिसत नाही. त्यामुळे राेजच या रस्त्यावर वाहतूक काेंडी झालेली पाहायला मिळत आहे.
रस्ता आणि फुटपाथ खाेदण्यात आल्यामुळे पादचाऱ्यांना देखील चालण्यास अनेक अडचणी येत आहेत. पादचाऱ्यांना रस्त्यावरुनच चालावे लागत असल्याने वाहनाचा धक्का लागून अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता केव्हा तयार हाेणार आणि या रस्त्यावरील वाहतूक काेंडी केव्हा सुटणार असा प्रश्न आता वाहनचालकांना पडला आहे.
याबाबत बाेलताना डेक्कन वाहतूक विभागाचे पाेलीस निरीक्षक किरण बालवडकर म्हणाले, अनधिकृतपणे वाहने लावणाऱ्यांवर आम्ही कारवाई करत आहाेत. सध्या रस्त्याचे काम सुरु असल्याने वाहने कशाही पद्धतीने लावण्यात येत आहे. येत्या 20 तारखेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण हाेईल असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. नवीन रस्त्याच्या रचनेनुसार वाहने लावण्यासाठी जागा कमी पडण्याची शक्यता आहे. फर्ग्युसन तसेच जंगली महाराज रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग राेखण्यासाठी या दाेन्ही रस्त्यांवर पे अॅण्ड पार्क याेजना राबविण्याची आवश्यकता आहे. यामुळे लाेक बराच वेळ वाहने याठिकाणी लावणार नाहीत. तसेच अनधिकृत पार्किंग देखील करण्यात येणार नाही.