अनधिकृत पार्किंगमुळे कारागृहाच्या सुरक्षेला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 02:21 AM2018-08-30T02:21:58+5:302018-08-30T02:22:20+5:30
येरवडा मध्यवर्ती कारागृह : वाहतूक पोलिसांकडून केवळ जुजबी कारवाई; नो पार्किंगच्या बोर्डाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
पुणे : ‘आशिया खंडातील सर्वांत मोठे कारागृह’ अशी ओळख असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा अनधिकृत पार्किंगमुळे धोक्यात आली आहे. एअरपोर्ट रोडला नागपूर चाळीच्या समोर कारागृहाच्या भिंतीला लागून अनेक वाहने लावली जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतानादेखील वाहनचालक तेथेच वाहने लावत आहेत. त्यांच्यावर जुजबी कारवाई होत असल्याने पहिले पाढे पंचावन्न अशीच काहीशी स्थिती येथे पाहायला मिळत आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृह हे भारतातील एक महत्त्वाचे आणि संवेदनशील कारागृह आहे. या कारागृहात गंभीर गुन्ह्यांतील आरोपी शिक्षा भोगत आहेत. आजमितीला साधारण साडेपाच हजाराहून अधिक कैदी या कारागृहामध्ये आहेत. त्यामुळे या कारागृहाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. कारागृहाच्या सर्वबाजूंनी सुरक्षा भिंत आहे. एअरपोर्ट रोडवरील सुरक्षा भिंतीला लागून अनेक वाहने पार्क केली जातात. प्रत्यक्षात या ठिकाणी वाहने पार्क करण्यास बंदी आहे. तसे बोर्डही तेथे लावण्यात आले आहेत. परंतु अनेक वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करून वाहने लावत असतात. वाहतूक पोलिसांकडून जुजबी कारवाई होत असल्याने नियम मोडणाऱ्यांवर जरब बसत नसल्याचे चित्र आहे. रात्रीच्यावेळी तर सर्रास वाहने लावली जात असल्याने कारागृहाची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्याचबरोबर कारागृहातील कैद्यांना भेटण्यासाठी तसेच घेण्यासाठी येणारे लोक हे कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहने थांबवत असतात. त्याचबरोबर या भागात मोठी वाहतूककोंडीसुद्धा होत असते. या भागात कोठेही वाहन थांबविण्यास बंदी आहे. महिनाभरापूर्वी जामिनावर सुटलेल्या आरोपीने एका तुरुंग अधिकाºयावर गोळीबार केला होता. यात सुदैवाने अधिकारी वाचले असले तरी सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला होता. त्यामुळे तुरुंग अधिकाºयांना स्वत:च्या संरक्षणासाठी बंदूक सोबत बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सुरक्षेचा आढावा : ...तर कारवाई करणार
याबाबत पुण्याच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या, शहरातील जे रस्ते मोठे आहेत आणि त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वाहने लावणे शक्य आहे. परंतु अनेक वर्षांपासून तो भाग नो पार्किंग म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशा रस्त्यांचा अभ्यास करून ते ठिकाण अधिकृत पार्किंगसाठी घोषित करता येईल का, याचा विचार आम्ही करत आहोत. येरवडा कारागृहाच्या संदर्भात त्या भागाची पाहणी करून तेथील पार्किंगमुळे कारागृहाच्या सुरक्षेला धोका पोहचणार असेल तर निश्चित तेथे कारवाई करण्यात येईल.