महापालिकेच्या तलावाचा अनाधिकाराने ताबा
By admin | Published: May 4, 2017 02:54 AM2017-05-04T02:54:34+5:302017-05-04T02:54:34+5:30
धनकवडीमधील तीन हत्ती चौकातील महापालिकेच्या मालकीच्या विष्णू ऊर्फ अप्पासाहेब जगताप तरणतलाव व व्यायामशाळेचा
पुणे : धनकवडीमधील तीन हत्ती चौकातील महापालिकेच्या मालकीच्या विष्णू ऊर्फ अप्पासाहेब जगताप तरणतलाव व व्यायामशाळेचा महापालिकेत पैसे जमा न करताच ताबा घेण्यात आला. राजकीय वरदहस्तातून हा प्रकार झाला असून महापालिकेच्या मालमत्ता विभागाने आता संबधितांकडे १४ लाख ४० हजार रुपयांच्या वसुलीसाठी तगादा सुरू केला आहे. अजून पैसे जमा झाले नसले तरी तलावाचा ताबा संबधिताकडेच असून त्याचा बिनदिक्कतपणे व्यावसायिक वापर केला जात आहे.
दरमहा १ लाख रुपये २० हजार रुपये भाडे याप्रमाणे गुंजाळ यांची निविदा मंजूर झाली. नियमाप्रमाणे त्यांनी ६ महिन्यांचे भाडे अनामत रक्कम म्हणून जमा करणे आवश्यक होते. २६ जून २०१६ रोजी त्यांनी ही रक्कम जमा केली असे मालमत्ता विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांना १ आॅगस्ट २०१६ रोजी ताबा देण्यात आला. त्यानंतर मात्र गुंजाळ यांनी काहीही पैसे जमा केलेले नाही. आॅगस्ट २०१६ ते एप्रिल २०१७ या कालावधीचे १० लाख ८० हजार रुपये त्यांनी थकवले. तसेच ३० जून २०१६ रोजी ३ महिन्यांचे भाडे आगाऊ जमा करण्याबाबत कळवल्यानंरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
महापालिकेकडे पैसे जमा नाहीत, मात्र तलावाचा ताबा गुंजाळ यांच्याकडे असेच आॅगस्ट २०१६ पासून सुरू आहे. गुंजाळ यांच्याकडे एकूण १४ लाख ४० हजार रुपयांची वसूली निघते आहे. ती जमा होत नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर महापालिकेचा करारनामाही झालेला नाही. तो व्हावा यासाठी रक्कम जमा करावी, म्हणून मालमत्ता विभागाने आता त्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान या तलावाचा व्यावसायिक वापर सुरू आहे. तिथे रितसर पोहण्याचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतो. तसेच शुल्क आकारून पोहणेही सुरूच आहे.
पत्रव्यवहारातून माहिती उघह
एकूण १४ लाख ४० हजार रुपयांच्या वसुलीसाठी महापालिकेने तलाव ताब्यात असलेल्या अभिजित गुंजाळ यांना नोटीस बजावली आहे. महापालिकेने हा तलाव चालवण्यासाठी म्हणून जाहिरात दिली होती. गुंजाळ यांच्यासह आणखी काही जणांनी निविदा दाखल केली. सन २०१६ मध्ये गुंजाळ यांची निविदा मंजूर झाली. त्यांनी नियमाप्रमाणे सर्व अटीशर्ती पूर्ण करून त्यानंतरच तलावाचा ताबा घेणे गरजेचे होते. मात्र तसे काहीही न करता त्यांनी तलावाचा ताबा घेतला व महापालिकेनेही तो दिला, असे उपलब्ध पत्रव्यवहारावरून दिसते आहे.
तलाव माझ्या नावावर घेतला असला तरी प्रत्यक्षात तो दुसरी व्यक्ती चालवत आहे व माझ्या माहितीप्रमाणे महापालिकेच्या वसुलीच्या नोटीशीनंतर सर्व पैसे जमा करण्यात आलेले आहेत.
- अभिजित गुंजाळ
महापालिकेची मालमत्ता भाडेतत्त्वावर घ्यायची असेल तर त्याचे अनेक नियम आहेत. महापालिकेचे आर्थिक नुकसान करून ही मालमत्ता दिली गेली आहे, असे स्पष्ट दिसते आहे. स्थानिक नगरसेवकांना अंधारात ठेऊन प्रशासन अशा गोष्टी करणार असेल तर आम्हाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल. प्रशासनाने राजकीय दबावातून अशा गोष्टी करू नयेत.
- आबा बागूल,
स्थानिक नगरसेवक