पुणे शहरात अनधिकृत 'टेरेस हॉटेल्स'चे पेव; महापालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 03:53 PM2020-12-15T15:53:31+5:302020-12-15T15:54:08+5:30
महापालिकेची कुठलीही परवानगी नसताना सर्रास होतोय व्यावसायिक वापर
पुणे : शहरामध्ये विशेषत: उपनगरांमध्ये व्यावसायिक इमारतींच्या टेरेसवर अनाधिकृतरित्या शेड टाकून व गार्डन लुक देऊन, ‘रूफ टॉप’ चा सर्रास वापर केला जात आहे़ याकरिता कुठल्याही प्रकारची महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेतली जात नसून, महापालिकेचेही या ‘रूफ टॉप’ वापराच्या नव्या पध्दतीकडे दुर्लक्ष झाले आहे.
व्यावसायिक इमारतीचा बांधकाम परवाना देताना इमारतीच्या टेरेसचा वापर सर्वांनाच करता येतो. पण या टेरेसवर अनाधिकृतरित्या शेड मारून हजारो स्वेअर फूट जागेत हॉटेल व रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू असल्याचे बहुतांशी व्यावासायिक इमारतींवर दिसून येत आहे. दोन-तीन मजल्यांच्या इमारतींपासून इतर उंच इमारतींच्या टेरेसचा वापर याकरिता होत आहे. विशेष म्हणजे हॉटेल व्यावसायिकांना इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरील जागा भाडेतत्वावर देऊन, त्यांना टेरेसवर आपला व्यवसाय विस्तार करण्यास मोकळीक काही इमारत मालकांकडून दिली जात आहे़ अशावेळी इमारतीच्या शेवटचा मजला वापरताना टेरेसवर हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांचा मोठा विस्तार केला जात असून, टेरेसच्या कठड्याला रंगीत दिवे असलेले अँगल लावणे, हिरवी नेट बांधणे तसेच पत्र्याचे शेड उभारणे, या माध्यमातून गार्डन लुक देऊन ओपन टेरेसवर मोठ-मोठ्या आवाजात लाऊड स्पिकरवर गाणी लाऊन, सर्रास मद्यविक्रीही केली जात आहे.
-------------
‘रूफ टॉप’ वापरासाठी कोणीही घेतली नाही परवानगी
नवीन बांधकाम नियमावलीत ‘रूफ टॉप’ वापर करताना, त्याच्या वापरापूर्वी टेरेसवर अत्यावश्यक सुरक्षा सोयी सुविधांसह टॉयलेट,बाथरूम असणे आवश्यक आहे. शहरात आजमितीला शेकडो व्यावसायिकांकडून ‘रूफ टॉप’चा वापर केला जात असला तरी, यापैकी एकानेही महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून परवानगी घेतल्याची नोंद नाही.
--------------------
टेरेसवरील अनाधिकृत हॉटेल्सवरील कारवाई थंडच
मुंबईमध्ये सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘रूफ टॉप’ला आग लागल्याने, तेथील नागरिकांना एकच जीना असल्याने लागलीच उतरता न आल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील अशा ‘रूफ टॉप’वर कारवाईही केली होती. परंतु, ही कारवाई थंड होताच विशेषत: लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी टेरेसवर अनाधिकृत शेड टाकून त्यांचा आता व्यावासायिक वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे़.
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सध्या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. परंतु या टेरेसवरील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात नाही.यामुळे या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करून, ओपन टेरेस बार बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
--------------------------