पंजाब व महाराष्ट्राचे अतूट नाते
By Admin | Published: April 14, 2015 11:37 PM2015-04-14T23:37:16+5:302015-04-14T23:37:16+5:30
‘‘पंजाब आणि महाराष्ट्राचे अनेक पिढ्यांपासून अतूट नाते आहे. आजपर्यंत कोणी एवढे आदरातिथ्य केले नसेल, असे माझे आदरातिथ्य सासवडकरांनी केले.
सासवड : ‘‘पंजाब आणि महाराष्ट्राचे अनेक पिढ्यांपासून अतूट नाते आहे. आजपर्यंत कोणी एवढे आदरातिथ्य केले नसेल, असे माझे आदरातिथ्य सासवडकरांनी केले. माझ्या हाताने संत नामदेवमहाराजांच्या सांस्कृतिक भवनाचा शिलान्यास होणे, ही माझ्या दृष्टीने गौरवाची बाब आहे ,’’ असे प्रतिपादन दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष जी. के.मनजितसिंग यांनी केले.
सासवड येथील नामदेव मंदिराच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन जी. के . मनजितसिंग यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी कृषि राज्यमंत्री दादा जाधवराव, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, सरहदचे संस्थापक संजय नहार, मोहनसिंग राजपाल, नामदेवांचे सोळावे वंशज कृष्णदासमहाराज मानदास, हेमंत माहुरकर, राजेंद्रअप्पा जगताप, बंडूकाका जगताप, वसंत बसाळे, गोविंद बोत्रे, प्रकाश बोत्रे आदी उपस्थित होते.
या वेळी मनजितसिंग यांनी नामदेव मंदिराच्या पुनर्निर्माण प्रकल्पासाठी दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक समितीतर्फे अडीच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. नामदेव मंदिराच्या उभारणीसाठी शीख समाज संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
पंजाब आणि महाराष्ट्राचे १३व्या शतकापासून अतूट नाते असून १३व्या शतकात संत नामदेवमहाराजांनी घुमान येथे २० वर्षे राहून शीख संप्रदायास मार्गदर्शन केले होते. तोच वारसा पुढे भगसिंगसमवेत शहीद राजगुरू यांनी चालविला. गुरू गोविंदसिंग यांनी महाराष्ट्रात कार्य करून पंजाब व महाराष्ट्रातील सांस्कृतिक देवाण-घेवाण आणखी घट्ट केली, असे ते म्हणाले.
विजय शिवतारे यांनीही या ऐतिहासिक व सांस्कृतिक भवनासाठी सरकारी निधीतून रु. २० लाखांपर्यंतचे अर्थसाह्य उपलब्ध होण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करेन, अशी हमी दिली. या प्रसंगी ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे यशस्वी केल्याबद्दल संजय नहार यांचा मनजितसिंग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांनी या मंदिरासाठी मदत करण्याचे जाहीर केले. सु. सा. खळदकर यांनी प्रास्ताविक केले. रेणुका महाजन यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना चिंबळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन संजय नेवासकर, चंद्रकांत बसाळे, किशोर हेंदे्र, सचिन चिंबळकर, सूर्यकांत क्षीरसागर यांनी केले. (वार्ताहर)
‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल, वाहे गुरुजीका खालसा, वाहे गुरुजीकी फतेह’ व ‘संतशिरोमणी नामदेवमहाराज की जय’ अशा पंजाबी व मराठीच्या घोषणांसह ढोल, बँड व तुतारीच्या निनादात घोडे, मावळे, भगवे फेटे, भगवे झेंडे, वारकरी, विरांगना इत्यादींच्या सहभागासह सासवड शहरातून काढण्यात आलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.