उलगडली रंगांची दुनिया!
By admin | Published: February 19, 2016 01:41 AM2016-02-19T01:41:48+5:302016-02-19T01:41:48+5:30
फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद बागडणारी चिमुरडी... आपापल्या भावविश्वातील चित्र रंगवून त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती... श्रीकृष्णाच्या लीला तसेच दसरा
पुणे : फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद बागडणारी चिमुरडी... आपापल्या भावविश्वातील चित्र रंगवून त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती... श्रीकृष्णाच्या लीला तसेच दसरा, दिवाळी, ईद, नाताळसारख्या सणांचे महत्त्व, गावातील जत्रा, खेळणी असे वैविध्य, तर दुसरीकडे हरिण, अस्वल, घोडा, झेब्रा, घार, बदक, कावळा, चिमणी, पोपट असे पशू-पक्षी इत्यादींनी राजा रविवर्मा आर्ट गॅलरीतील वातावरण चित्रमय झाले होते.
सिंहगड रस्त्यावरील कलावती आर्ट क्लासतर्फे ‘विंग्ज आॅफ आर्ट’ हे रंगांची उधळण करणारे आणि चिमुरड्यांच्या कल्पकतेचे पंख विस्तारणारे वार्षिक चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे. मिनी केजीपासून दहावीतील चित्रकारांनी साकारलेली विविध विषयांवर चित्रे येथे पाहायला मिळत
आहेत.
आपल्या कल्पनेतील विश्वाला वास्तवाशी जोडून सुंदर चित्रे साकारण्याची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली आहे.
संस्थेचा सर्वांत छोटा चित्रकार ओजस मते याच्या हस्ते गुरुवारी चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. दर वर्षी चित्रकृतींसाठी विशिष्ट विषयाची निवड केली जाते. या वर्षी फुले आणि फुलपाखरे हा विषय निवडण्यात आला आहे. प्रदर्शनाच्या दर्शनी भागात फुलपाखराच्या नक्षीमध्ये विद्यार्थ्यांचे फोटो लावून कल्पकतेची झलक दिसते.
हे प्रदर्शन १८ व १९ फेब्रुवारी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले आहे. (प्रतिनिधी)