नऱ्हे पुलाखाली बेशिस्त वाहतूक
By admin | Published: March 28, 2017 02:48 AM2017-03-28T02:48:48+5:302017-03-28T02:48:48+5:30
बंगळुरू ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा लहान-मोठ्या अपघातांनी चर्चेत राहिला आहे
आंबेगाव बुद्रुक : बंगळुरू ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा लहान-मोठ्या अपघातांनी चर्चेत राहिला आहे. प्रशासनालादेखील या प्रश्नाचे फारसे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. उपाययोजना केल्या असल्या, तरी त्या तोकड्या पडत असल्याचे दिसून येत आहे.
नऱ्हे पुलाखालील वाहतुकीतील अडथळे दूर करण्यात आले. मात्र, शिस्त नसल्याने वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. या पुलाखाली कात्रज, सातारा, नऱ्हेगाव, वडगावकडून येणाऱ्या वाहनांमुळे गोंधळलेली स्थिती दिसत आहे. पायी चालणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्याचे चित्र आहे.
नऱ्हे पुलाखालून वडगावला जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता असून, या रस्त्यावर सिंहगड रोडकडून येणाऱ्या वाहनांमुळे पुलाखाली मोठी कोंडी होत आहे. वडगावकडून कात्रजच्या दिशेने वाहने जाताना रोडच्या कडेला वडापाव सेंटरसमोर लावलेल्या खासगी वाहनांमुळे कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनाही कोंडी फोडताना नाकीनऊ येत आहेत. एकाच वेळी चारही बाजूने वाहने येत असल्याने समस्यात भर पडत आहे. येथे सिग्नल्सही नाहीत. त्यामुळे प्रशासनाने कोंडी फोडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)