बालभवन सुरू होण्याबाबत अनिश्चितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:10+5:302020-12-24T04:11:10+5:30
पुणे : शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा या ...
पुणे : शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा या आनंदी उत्सवाला मुले मुकली आहेत. मुले बालभवन उघडण्याच्या आशेवर असताना ती सुरू होण्याबाबत अनिश्चितता असल्याचे ‘बालभवन’कडून ‘लोकमत’ला सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गोष्टींबरोबर शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. पण कालांतराने सर्व काही टप्प्याप्प्याने चालू होतं गेले. शाळेबाबत कुठलाही ठाम निर्णय झाला नाही. त्यामुळे वर्षभर घरात बसून असलेली मुले आता फारच कंटाळली आहेत.
गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही ऑनलाइन उपक्रम, विविध कला, शिबिरे घेत आहोत. बालभवनच्या ताई ऑनलाईन ग्रुपच्या माध्यमातून मुलांकडून सर्व काही करून घेत आहेत. मुलांनी सातत्याने क्रिएटिव्ह करत राहिले पाहिजे. आताच्या परिस्थितीत शाळेवर सर्व अवलंबून आहे. शाळेत तरी मुलांना अंतर ठेवून बसवता येते. पण बालभवनात अंतर ठेवून खेळायला लावणे अशक्य आहे. आम्ही हा धोका पत्करू शकत नाही. मुले खूपच कंटाळली आहेत. त्यात पालकांची तयारी नाही. सध्या ऑनलाईन उपक्रम, शिबिरे सोयीस्कर ठरत आहे.
..................
शहरातील बालभवन शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता मुले खूप कंटाळली आहेत. ते मैदानाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शहरात सर्व शालेय उपक्रमही बंद आहेत. बालभवन सुरू करणे ही एक जोखीम आहे. जगभरातील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य शासनही शाळेबाबत कुठलाही ठोस निर्णय घेऊ शकत नाही. पालक स्वतःच्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवत नाहीत. तर बालभवनात तरी पाठवण्यास कसे तयार होतील.
माधुरी सहस्रबुद्धे, संचालिका, बालरंजन केंद्र