अनिश्चितता, चिंताग्रस्तता अन् खिन्नतेमुळे तरुणांमध्ये नैराश्य वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:11 AM2021-05-09T04:11:05+5:302021-05-09T04:11:05+5:30
पुणे : कोरोनाचे वाढते संकट आणि सातत्याने लागू केल्या जाणाऱ्या संचारबंदीमुळे सामान्य माणसाच्या जीवनात नकळतपणे मानसिक ताण-तणावाने प्रवेश केला ...
पुणे : कोरोनाचे वाढते संकट आणि सातत्याने लागू केल्या जाणाऱ्या संचारबंदीमुळे सामान्य माणसाच्या जीवनात नकळतपणे मानसिक ताण-तणावाने प्रवेश केला आहे. विशेषत: या कोरोनाच्या कालखंडात चिंताग्रस्तता, खिन्नता, अनिश्चितता, अपेक्षाभंगामुळे येणारे दु:ख, प्रचंड ओढा-ताण या कारणांमुळे तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. या आप्तकालीन परिस्थितीचा सामना करताना तरुणवर्ग गोंधळलेला असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे. परंतु, ‘बहारे फिर भी आयेगी’....हे वाक्य सातत्याने मनाशी बाळगल्यास जगण्याला बळ मिळेल. निरोगी, आनंदी आयुष्य जगा आणि तुमचा हा अनुभव इतरांसोबत शेअर करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असल्याने सर्वांवर मानसिक ताण-तणाव वाढले आहेत. कोरोनाने जोडप्यांना एकत्र येण्याची दिलेली संधी देखील घटस्फोटामध्ये परिवर्तित होत आहे. समाजात एकप्रकारे नकारात्मक वातावरण पसरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, अशी हार मानून उपयोगी नाही. सकारात्मक विचारांची पेरणी करा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.
----------------
एक वर्ष आपण कशीतरी मनाची समजूत काढत राहिलो. आता पुढच्या आव्हानांना तोंड द्यायला स्वत:ला सज्ज केलं पाहिजे. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद याच्या हिंदोळ्यावर मनाला ठेवतो तेव्हा कालांतराने मन हे बंडखोरीकडे वळते. ‘नको आहेत निर्बंध, सर्व बंधन’ झुगारून देऊयात असा बंडखोर विचार मनात यायला लागतो आणि सर्व निर्बंध जाचक वाटायला लागतात. यासाठी प्रतिसादाचा जो आपला प्रवाह आहे त्याची एक शैली किंवा पॅटर्न बनवायचा आहे. त्यात सराव आणि सहजता आणायची आहे. आपण जे करीत आहेत त्याची गुणवत्ता वाढवावी लागेल. मनाची उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे. या काळात विचारप्रक्रिया चांगली ठेवणे गरजेचे आहे. एवढे करून फायदा काय? एवढे केले तर माझ्या हातात काय? पडणारे? अशा पद्धतीच्या बाहेरून येणाऱ्या विचारांना बाजूला ठेवूया आणि विचारप्रक्रियेला प्राधान्य देऊया.
- डॉ. आनंद नाडकर्णी, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ
-------------------------------------------------
तरुणाला घरात थांबायचं, बाहेर पडायचं नाही अशा कृत्रिम बंधनात जगावं लागत आहे. या अनैसर्गिक बंधनामुळे हिरमोड, अपेक्षाभंग आणि नैराश्य येते. भावनांना दाबून ठेवायचे हाच मोठा ताण आहे. प्रत्येक जण मोकळेपणामुळे आनंदी आहेत असे नाही. सामान्य वर्तनाचे जे संकेत दिले आहेत. त्यांनाच आव्हान मिळत आहे. त्यामुळे मनुष्य गडबडून गेला आहे. विचारांची कोणतीच शाखा उपलब्ध नाही. त्याचा कोणताच अनुभव नाही. कशाच्या बळावर आपण नवीन वर्तन उभे करायचे हे अवगत नाही. कारण, नवीन वर्तन उभे करतानाही त्याचा एक इतिहास असतो. एक अनिश्चिततेची लढाई सुरू आहे. जिंकणार कोण? हे माहिती नाही, तरी लढाई मात्र खेळायची आहे आणि त्यातून बाहेर पडायचे आहे. केवळ बैद्धिक आणि मानसिक पातळीवर ही लढाई लढायची आहे, ज्याला शारीरिक साथ नाही. मनाला धाडस करून नवीन करण्याचा वाव नाही. जे करायचंय त्यावर बंधने आहेत. त्यामुळे नैराश्य अधिक येत आहे.
-डॉ. उल्हास लुकतुके
--------------------------------------
आसपासचे नकारात्मक वातावरण पाहिल्यानंतर एकप्रकारचे नैराश्य येत आहे. आत्ता कुठं सर्व सुरळीत चालले होते. नवीन नोकरी लागली, घराचे पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. पण, कोरोनामुळे अनिश्चिततेची टांगती तलवार सातत्याने डोक्यावर असते. एकीकडे कुटुंबाला जपायचे, दुसरीकडे नोकरी जपायची अशी दुहेरी कसरत करावी लागत आहे. मग मानसिक ताण-तणाव येणारचं ना? तरीही सकारात्मक राहून कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.
- प्रशांत देशपांडे, इंजिनियर
----------
काय करायला हवं?
* मनाची तब्येत उत्तम राखायची.
* आपण खचलो किंवा मनाचे खांब कोसळले असे बोलायचे नाही.
* मी हे करू शकतो, हे वाक्य मनाशी हजारवेळा काढायचे.
* संकटच संकट आहेत असे सातत्याने बोलत राहू नका. मी उत्तम आहे यात आनंद मानायचा.
---------------------------------------------------------------------------