सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता; महोत्सव पुढे ढकलला जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 12:13 PM2020-12-02T12:13:36+5:302020-12-02T12:13:45+5:30

यंदा कोरोनाच्या संकटामुळे महोत्सव करायचा किंवा नाही या द्विधा परिस्थितीत आयोजक अडकले आहेत.

Uncertainty over Sawai Gandharva Bhimsen Festival; Will the festival be postponed? | सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता; महोत्सव पुढे ढकलला जाणार?

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता; महोत्सव पुढे ढकलला जाणार?

Next
ठळक मुद्दे यंदा महोत्सव होणार का? की ऑनलाइन महोत्सवाचे आयोजन केले जाणार? अशी विचारणा

पुणे : डिसेंबर महिना उजाडला की ’कानसेनां’ना वेध लागतात ते देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे. भारतीय अभिजात संगीत विश्वात या महोत्सवाने एक मानदंड प्रस्थापित केला आहे. यंदा महोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी प्रवेश मर्यादा निश्चित केली आहे. परंतु दरवर्षी महोत्सवाला येणाऱ्या दर्दी रसिकांची संख्या पाहता यंदाच्या वर्षी महोत्सवाच्या आयोजनाबाबत एकप्रकारची अनिश्चितता आहे. 

सरकारने मोठे कार्यक्रम करण्यास परवानगी देण्याची आयोजक वाट बघत आहेत. ती न मिळाल्यास यंदाचा महोत्सव पुढे ढकलण्याचे संकेत आयोजकांकडून देण्यात आले आहेत. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने  ‘सवाई गंधर्व भीमसेन’ संगीत महोत्सव आयोजित केला जातो. सूर, लय, ताल अशा त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या या महोत्सवात नव्या-जुन्या पिढीतील दिग्गज कलावंतांचे सुरेल अविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळते. त्यामुळे या महोत्सवाची रसिक आतुरतेने वाट पाहात असतात. शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिल्यामुळे महोत्सवाबाबत रसिकांच्या महोत्सवाविषयीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदा महोत्सव होणार का? की ऑनलाइन महोत्सवाचे आयोजन केले जाणार? अशी विचारणा रसिकांकडून केली जात आहे. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे महोत्सव करायचा किंवा नाही या द्विधा परिस्थितीत आयोजक अडकले आहेत. महोत्सवाबाबत अद्याप तरी आयोजकांनी ठोस कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. याविषयी  ‘लोकमत’ने आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता व्यक्त केली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला देशविदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कानसेन हजेरी लावतात. स्वरमंडपात बसून कलाकारांना ऐकणे ही रसिकांसाठी सुखद अनुभूती असते.  ऑनलाइन महोत्सवात हा अनुभव  मिळणे शक्य नाही. त्यामुळे हा महोत्सव आँनलाइन आयोजित करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. 
----------------------------------------------- 
’कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठे कार्यक्रम करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. सरकारने परवानगी दिल्यानंतर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव करायचा की नाही यावर आम्ही विचार करू- श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ
 -------------------------------------------------

Web Title: Uncertainty over Sawai Gandharva Bhimsen Festival; Will the festival be postponed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.