राज्य नाट्य स्पर्धांच्या आयोजनाबाबत अद्यापही अनिश्चितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:52+5:302020-12-17T04:38:52+5:30
पुणे : राज्य सरकारने ५० टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली अन एकामागून एक व्यावसायिक आणि प्रायोगिक ...
पुणे : राज्य सरकारने ५० टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली अन एकामागून एक व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांचे पुनश्च हरीओम झाले. मात्र, राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नाट्य स्पर्धांच्या आयोजनाबाबत अजूनही अनिश्चितता आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धा होतात. सरकारचे आदेश येतील त्यानुसार स्पर्धेविषयी निर्णय घेण्यात येईल, असे संचालनालयाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य नाट्य स्पर्धांमध्ये कला संस्था, केंद्र आणि महाविद्यालये हिरिरीने सहभाग घेतात. त्यातंर्गत मराठी, हिंदी, संस्कृत भाषेतील नाटकांसह संगीत नाटक आणि बालनाट्य स्पर्धाही आयोजित केल्या जातात. यंदा कोरोनामुळे स्पर्धांच्या आयोजनाच्या तयारीला सुरुवात झालेली नाही. सरकार पातळीवर स्पर्धांच्या बाबतीत अद्यापही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.
याविषयी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चावरे म्हणाले, सरकारने अजूनही स्पर्धांच्या आयोजनाला परवानगी दिलेली नाही. सरकारच्या पुढील आदेशानुसार निर्णय घेण्यात येईल. सरकारच्या परवानगीची आम्ही वाट पाहत आहोत.